कोल्हापूर : सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या कडे गेलो होतो. कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी दिल्यास तोही चांगलं काम करेल, राजेश क्षीरसागर यांना आम्ही डावलून गेलेलो नाही. सत्यजित कदम यांचा विचार व्हावा असे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून महाडिक गटाकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ भाजपला सुटण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 


कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटले


कोल्हापूर उत्तर बाबत अफवा कोणी पसरवली हे सांगता येणार नाही. या संदर्भात महायुतीच्या नेत्यांचा गैरसमज होऊ नये. मी उमेदवारीसाठी कोणताही हट्ट केलेला नाही. प्रत्येक विधानसभेला उमेदवारांचं मेरीट ठरवलं जातं आणि त्यानंतरच उमेदवारी जाहीर होते, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटला. मुख्यमंत्री यांनीही त्याची माहिती घेतली. कोल्हापूर उत्तरसाठी अजून कोणाचेही नाव निश्चित नाही. महायुतीकडे उत्तरसाठी तीन उमेदवार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे दहा उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आहे. सर्वात जास्त कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे, असे ते म्हणाले.  


कृष्णराज महाडिक यांची पॉप्युलरिटी चांगली 


त्यांनी सांगितले की, कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही हा सर्व निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे.  राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली तर मी स्वतः त्यांचा प्रचार प्रमुख असेन. जर सत्यजित नाना कदम यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचं काय करायचं हे मुख्यमंत्री ठरवतील. सत्यजित कदम मेळावा घेत आहेत. मात्र,  त्यांनी विचार करावा. चुकीच्या पद्धतीच्या अफवा आणि गैरसमज होऊ नये. कृष्णराज महाडिक यांची पॉप्युलरिटी चांगली आहे जनसंपर्क चांगला असल्याचे ते म्हणाले. 


इलेक्टिव्ह मेरिटवर सर्व ठरेल


ते पुढे म्हणाले की, राजेश क्षीरसागर यांचा उत्तरवर क्लेम असणं साहजिक आहे. इलेक्टिव्ह मेरिटवर सर्व ठरेल. राजेश क्षीरसागर यांचं पुनर्वसन करण्याचं निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असेल. सत्यजित कदम यांनी बंडखोरी केल्यास ती आम्ही रोखू राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल असेल तर आम्ही त्यांचा फॉर्म भरण्यासाठी पुढे असेल. महाविकास आघाडी प्रचंड गोंधळात आहे. म्हणून त्यांची उमेदवारी घोषित होत नाही. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड सर्कस आहे. तसा गोंधळ आमच्यामध्ये नाही. आमचे निर्णय झालेले आहेत, उद्या संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मोठे नेते संजय मंडलिक हे उपस्थित होते, त्यामुळे अपप्रचार होऊ नये, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या