कोल्हापूर: निवडणुकांना काहीच दिवस असताना आता पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेते जाणार आहेत, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कोल्हापुरात महायुतीच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अंबाबाईचे दर्शन घेऊन ते आदमापुर या ठिकाणी आपली जाहीर सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री हे सुरुवातीला पट्टणकोडोली आणि शिरोळ या ठिकाणी सभा घेणार आहेत आणि त्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये महायुतीची सभा होणार आहे.या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात नेत्यांनी प्रचारकाचा धडाका लावला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांकडून प्रचाराचा धडाका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही सभा होणार आहेत. 8 आणि 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण चार ठिकाणी सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या 8 नोव्हेंबरला धुळे आणि नाशिकात दोन सभा होणार आहेत. आज नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापुरात महायुतीच्या सभेला हजेरी लावणार आहेत. अकोला आणि नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबरला जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महायुतीचे सरकार आणण्यासाठी फडणवीसांकडून मोठ्या संख्येने सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस आज दक्षिण - पश्चिम मतदारसंघात प्रचाराचे नारळ फोडणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण - पश्चिम मतदारसंघात प्रचाराचे नारळ फोडणार आहेत. हिंगणा नाकापासून देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो (प्रचार रॅली) असून दक्षिण - पश्चिम नागपूरच्या प्रमुख मार्गाने हा रोड शो जाणार आहे, या रोड शोच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करणार आहे, या रोड शोच्या माध्यमातून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस शक्ती प्रदर्शन करतील. सकाळी 9 वाजता या रोड शोला सुरुवात होणार आहे.