पुणे: विधानसभेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुस्तकातून बॉम्ब टाकला. यातून भाजपने ईडीची भीती दाखवून पक्ष फोडल्याचं आणि या नेत्यांनी विकासासाठी नव्हे कारवाई टाळण्यासाठी सत्ता काबीज केली. हे सत्य आता भुजबळांनी स्वतःचं कबूल केल्याचं यातून दिसतं असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिवाय भाजप फक्त नेत्यांना नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांना ही जाणीवपूर्वक चौकशीच्या फेऱ्यात अडकवत होतं, हे सुद्धा सुनेत्रा काकींच्या बद्दल पुस्तकात नमूद करण्यात आलेल्या घटनेवरून सिद्ध झालं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवारांनी लक्ष वेधलं आहे. 


नेमकं काय म्हणालेत रोहित पवार?


आम्ही आधिपासून हेच सांगत होतो. जे नेते गेले आहेत ते विकासासाठी गेलेले नाहीत. महाराष्ट्राच्या हितासाठी गेलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई होत होती, त्याच्यापासून पळण्यासाठी ते सत्तेत गेले आहेत. या सर्व गोष्टी वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर केवळ फोडाफोडीचं राजकारण आणि दबावतंत्र या सर्वाच्या मागे आधुनिक काळाचा अनाजीपंत कोण हे लोकांना समजलेलं आहे. ही प्रवृत्ती आणि गुजरातची दबावशाही आहे आणि पैशांचा वापर आहे. तो या विधानसभा निवडणुकीत नागरिक धुडकावून लावतील अशा विश्वास आम्हाला आहे, असंही यावेळी रोहित पवारांनी म्हटलं आहे.


हसन मुश्रीफांना देखील अटक होणार होती, दिलीप वळसे पाटील यांना देखील अटक होणार होती, नगर जिल्ह्यातील देखील जे लोक आहेत, ते देखील त्याच कारणास्तव भाजपमध्ये गेले होते. आम्ही मराठी माणसं आहोत त्यामुळं आम्ही लढत आहोत. आम्ही दिल्लीसमोर झुकत नाही, काही जण झुकले. लोकसभेला नागरिकांनी त्याचा निर्णय दिला आणि आता विधानसभेला 170-180उमेदवार निवडून येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.


भाजप सत्तेत येण्यासाठी कुटूंब फोडू शकते. सत्तेचा बळाचा वापर करून दबावतंत्र वापरून पक्ष फोडत असल्याचं देखील आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे. या निवडणुकीत बदल दिसेल असंही यावेळी रोहित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.


विधानसभा निकालानंतर सत्तेची समीकरण बदलतील, असं सूचक विधान करणाऱ्या दिलीप वळसे पाटलांना रोहित पवारांनी चिमटा काढला आहे. बहुमत महाविकास आघाडीला मिळणार असल्यानं आम्हाला सत्तेसाठी कोणाची गरज नाही, अशी खोचक टिपणी रोहित पवारांनी केली आहे. भोसरीत अजित गव्हाणेंच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या रोहित पवारांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.