Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी केली आहे. सांगली विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरी झालीय तर शिराळा  आणि जत विधानसभामध्ये भाजपात (BJP)  बंडखोरी झाली आहे. यामध्ये सांगली विधानसभेत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यांना तिकीट मिळाल्याने जयश्रीताई पाटील यांनी नाराज होत बंडखोरी केली आहे. तर शिराळामध्ये भाजपमधून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी भेटल्याने सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय. जत विधानसभा मध्ये भाजपकडून।गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी भेटल्याने तमनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. आता या बंडखोरांचा निर्धार शेवटपर्यंत राहतो का आणि  बंडखोरी कायम राहिली तर ती कुणाला अडचणीची ठरणार हे पाहावे लागणार आहे.


सांगलीतून पृथ्वीराज पाटलांचे नाव घोषित होताच जयश्रीताई पाटील गटाकडून बंडखोरीची भाषा केली जाऊ लागली. मदन पाटील गटाच्या अस्तित्वासाठी आपल्याला या निवडणुकीत उतरावे लागेलच असे म्हणत जयश्रीताईनी बंडखोरी करण्याचे जाहीर केले. आज जयश्री पाटील आपला  अपक्ष अर्ज भरत आहेत. 


जत आणि शिराळ्यात भाजपची डोकेदुखी वाढली


जत विधानसभा मतदारसंघात भाजपात बंडखोरी झाली असून भाजपचे नेते तमनगौडा रवीपाटील लढवणार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी विरोधात ही उमेदवारी असणार आहे. माजी आमदार विलासराव जगतापांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या भाजप इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आला.


जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडी स्थापना करत  ही  निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळें जत भाजपात भूमिपुत्र विरुद्ध आयात असा संघर्ष बंडखोरीच्या वळणावर पोचला. भाजपा कडून गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जत मधील भाजप इच्छुकांनी पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत भूमिपुत्र उमेदवार देण्याची मागणी केली होती..पण पडळकर यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने  भाजपचे नेते तमनगौडा रवीपाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. 


शिराळा विधानसभेत भाजपची उमेदवारी न मिळाल्याने महाडिक गट नाराज झालाय. शिराळा विधानसभेत भाजपमधील सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचे जाहीर केलेय. भाजपचे सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभेची पक्षाकडे  उमेदवारी मागितली होती..पण  भाजपकडून शिराळा विधानसभेत सत्यजित देशमुख यांना  उमेदवारी जाहीर झाल्याने महाडिक गट  नाराज झाला. यामुळे महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा बंडखोरीचा निर्णय घेण्यात आला.


आणखी वाचा


कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार