Mumbai assembly constituency: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली आहे. अशातच महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या सभा, प्रचार रॅली यांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर मुंबई जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली असल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपची मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. 12 नोव्हेंबर रोजी शाहांच्या मुंबईत 2 जाहीर सभा होणार आहे.
बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात भाजपकडून विजयी शंखनाद सभांचे आयोजन केले जाणार आहे. घाटकोपरला सायंकाळी पाच वाजता तर बोरिवलीत संध्याकाळी साडेसहा वाजता सभेचे आयोजन केलं जाणार आहे. मुंबईतील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे. अमित शाहांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदीही 14 तारखेला मुंबईत सभा घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या चार दिवस 9 सभा, एक रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा काल धुळ्यात आणि नंतर नाशिकमध्ये पार पडली. त्यानंतर आज (शनिवारी) 9 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेड या ठिकाणी मोदींची सभा होईल. मंगळवारी, 12 नोव्हेंबर पुण्यात रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिमूर आणि सोलापुरात सभा घेणार आहेत. यानंतर गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, रायगड आणि मुंबईतील प्रचारसभांना नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.