पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये हडपसरमधून प्रशांत जगताप तर वडगाव शेरीमधून बापू पठारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र खडकवासला विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. या ठिकाणी सचिन दोडके यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ नेतृत्वाकडुन मिळत असल्याने खडकवासल्यासाठी इच्छुक असणारे पक्षातील नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. पक्षाचे नेते व माजी नगरसेवक किशोर धनकवडे यांनी शुक्रवारी कार्यकर्ता मेळावू घेऊन विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. (Khadakwasla Assembly Election 2024)


येत्या सोमवारी शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी देखील बंडाचे निशाण फडकवले असून रविवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्या नंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय खडकवासला विधानसभा  कार्यकारणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामे देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खडकवासल्यात मोठे खिंडार पडणार आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान आता पक्ष नेतृत्वासमोर असणार आहे. (Khadakwasla Assembly Election 2024)


मनसेकडून मयुरेश वांजळेंना उमेदवारी जाहीर


मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मयुरेश वांजळे यांचे वडील रमेश वांजळे हे खडकवासला मतदार संघातून 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर प्रचंड मतांनी निवडून आले होते. 


खडकवासला मतदारसंघात कशी आहे परिस्थिती (Khadakwasla Assembly Election 2024)
भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर चौथ्यांदा हॅटट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत, माजी आमदार कुमार गोसावी हे देखील इच्छुक आहेत. या मतदारसंघातून भाजपमधील माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, हरिदास चरवड, दीपक नागपुरे, दिलीप वेडे-पाटील इच्छुक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी उमेदवारी मागितली आहे. माजी नगरसेवक बाळा धनकवडे व काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, संघटनेत कार्यरत असणारे उद्योजक राहुल घुले- पाटील यांच्या सह नऊ जणांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सचिन दोडके यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन - अडीच हजार मतांनी त्यांचा केला होता.