मुंबई: विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सुक्ष्म तणाव निर्माण झाला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतान महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कोणताही तणाव नसल्याचे स्पष्ट केले आहे. 


संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत बिघाडी होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला सतावत होता. त्यामुळे आता मविआच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी राऊत-पटोले यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि अनिल देसाई यांना पुढे करण्यात आले आहे का, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला. यावर बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, आमच्यापैकी कोणीतरी एक नेता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार होता. मात्र, रमेश चेन्नीथला यांनी मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला सांगितले. शरद पवार आणि माझी चर्चा चांगली झाली. आता काही थोड्या जागांवर निर्णय बाकी आहे. यामधून लवकरच मार्ग निघेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 


मविआत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. कारण मविआतील तिन्ही पक्षांकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षाकडून आग्रह धरला जात आहे. यामध्ये कोणताही वाद नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 


बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंची भेट घेणार


शरद पवारांच्या निवासस्थानावरुन निघाल्यानंतर बाळासाहेब थोरात आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. आम्ही जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. बहुतांश जागांवर निर्णय झाला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. दोन-तीन पक्ष एकत्र असतात तेव्हा अशा अडचणी येतात. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची बातमी खोटी आहे. महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य नाही, हे ग्रामीण भागातील साध्या व्यक्तीलाही कळेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.


आणखी वाचा


ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण


देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या भेटीची आवई उठली, ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया