Radhanagari Vidhan Sabha :कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे राधानगरी आणि शाहूवाडी मतदारसंघ आले आहेत. मात्र आता राधानगरीमध्ये बंडखोरीचे चिन्हे आहेत. बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी दोन महिन्यात तिसऱ्यांदा पक्ष बदलताना मशाल हाती घेतली. शिवसेना ठाकरे गटाकडून के पी पाटील यांना राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, के पी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे मेहुणे ए वाय पाटील कोणती भूमिका घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती.


बंटी पाटलांना जाब विचारणार 


मात्र, आज (27 ऑक्टोबर) ए वाय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. ए वाय पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत राधानगरी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असलेले ए वाय पाटील यांनी आता विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे केपी पाटील यांच्या विरोधात ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. ए वाय पाटील यांनी बोलताना के पी पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. दरम्यान, मला शब्द दिला असताना उमेदवारी का नाकारण्यात आली हे बंटी पाटलांना जाऊन विचारणार असल्याचे सुद्धा ए वाय. पाटील यांनी सांगितले


नाव कृष्णा असलं तरी काम मात्र शकुनी मामाचं


पाटील यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माघार घेणार नाही. माझी लढाई महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात असल्याचे ए वाय पाटील म्हणाले. माझी लढाई महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी नसून के पी पाटील माझ्या उमेदवारीच्या आडवे आल्याचा आरोप त्यांनी केला. नाव कृष्णा असले तरी काम मात्र शकुनी मामाचं असल्याचा हल्लाबोल सुद्धा पाटील यांनी केला.


ते पुढे म्हणाले की राधानगरी तालुक्याला कधी उमेदवारी मिळालेली नाही, आता ही जनता खपवून घेणार नाही. त्यामुळे 2024 सालचा राधानगरी भुदरगड मतदारसंघाचा आमदार ए वाय पाटील असतील, असा दावा सुद्धा ए वाय पाटील यांनी केला. उमेदवारीसाठी खोके दिले असेल तर मला त्याची कल्पना नसल्याचा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावला. सांगलीचा पॅटर्न राज्यात पाहायला मिळेल असा दावा सुद्धा पाटील यांनी केला. मी अपक्ष म्हणून आमदार पण निवडून येईन असेही ते म्हणाले.