पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांनी उमेदवारी दिलेल्या सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवारांनी अखेर नवा डाव टाकला आहे. मावळमध्ये तुतारीचा उमेदवार न देता, अजित पवार गटातून बंडखोरी केलेल्या बापू भेगडेंना शरद पवार गटाने ही पाठिंबा जाहीर केला आहे. एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महायुतीकडून शेळकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याच दिवशी भाजपने बंडखोर बापू भेगडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली होती, शेळकेंना कोंडीत अडकवण्यासाठी पवारांनी सुद्धा हा नवा खेळला. सोमवारी शरद पवार गट बापू भेगडेंचा अर्ज दाखल करताना हजर राहणार आहे. स्थानिक शरद पवार गटाकडून ते जाहीर करण्यात आलं आहे.


बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, अशातच आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवारांच्या पक्षाने सुद्धा हा नवा डाव टाकण्याची तयारी केली आहे. मविआच्या जागावाटपात मावळ शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली होती. पवारांकडून सुद्धा या मागणीला संमती मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते भेगडेंच्या प्रचारात सक्रिय होताना दिसू लागलेत. सोबतच काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही भेगडेंना पाठिंबा देत शेळकेंना कोंडीत पकडणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं अजित पवार गटाच्या सुनील शेळके विरोधात अवलंबला जाणारा हा मावळ पॅटर्न अतीतटीचा होणार, हे उघड झालं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर बोलताना बापू भेगडे म्हणाले, सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे मला खूप दुःख झालं, त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला राम- राम ठोकला आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार हे आता निश्चित झालं आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतून बंडखोरी होणार असल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे यांनी पक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील पक्ष पदाचा राजीनामा दिला. बाळा भेगडे यांनी बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही विद्यमान आमदार सुनील शेळके यांचं काम करणार नाहीत, असा ठराव देखील करण्यात आला आहे.