मुंबई : वेगवेगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला गळती लागलेली आहे. कोणता आमदार कधी पक्षांतर करेल? अशी या पक्षांची सध्या अवस्था आहे. तर वंचित बहुजन आघाडी स्वबळाची तयारी करत आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना दुसरीकडे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह राज्यातील विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसत आहेत.
ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर मनसेकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत. येणारी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी हे पक्ष एकत्र येत आहेत. या विरोधीपक्षांनी एकत्र येण्याचं निमित्त EVM असलं तरी विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र यायला सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी सध्या सर्व पक्षीय नेत्यांना भेटत आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या जागा वाटपाची देखील चर्चा सुरू आहे.
ह्या सगळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. निम्मित आहे ईव्हीएम मशीनचं. लोकसभा निवडणुकीनंतर EVM ला वेगवेगळ्या माध्यमातून विरोध होत आहे. याबाबत नुकताच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पतील, अजित पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला लागलेली गळती, भाजप आणि शिवसेना यांचे वाढत चाललेले सामर्थ्य पाहता विरोधीपक्षांना एकत्र येण्याशिवाय सध्यातरी पर्याय दिसत नाही. ईव्हीएम मशीनच्या निमित्ताने सुरुवात तर होत आहे पण विरोधी पक्षांची ही आघाडी विधानसभा निवडणुकीत टिकते का? किती लढा देते? हे वेळच ठरवेल.
ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी, राज ठाकरेंसह महाआघाडीतील नेत्यांची आज पत्रकार परिषद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2019 08:47 PM (IST)
ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर मनसेकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -