मोझरी, अमरावती : विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भाजपचा विधानसभेसाठी प्रचार सुरु झाला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते महाजनादेश यात्रेच्या रथाला हिरवा झेंडा देत आज या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
संत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या अमरावतीच्या मोझरीमधून महाजनादेश यात्रेचा रथ रवाना झाला आहे. मोझरी ते नंदुरबार असा महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे. भाजपच्या या महाजनादेश यात्रेचा रथ शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या मतदारसंघातूनही जाणार आहे. तसंच महाजनादेश यात्रेनंतरच युतीचा अंतिम फैसला होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महाजनादेश यात्रेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या शुभारंभाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या ऐवजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं वैशिष्ट्ये
या महाजनादेश यात्रेदरम्यान एकूण 32 जिल्ह्यांत 4384 किमीचा प्रवास करण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेच्या दोन्ही टप्प्यात मिळून 150 मतदारसंघांना भेट देण्यात येणार आहे. यदरम्यान 87 मोठ्या सभा, 57 स्वागत सभा आणि 238 गावांमध्ये स्वागत समारंभ घेण्यात येणार आहेत.
विदर्भातील 44 मतदारसंघात 1232 किमीचा प्रवास
उत्तर महाराष्ट्रात 34 मतदारसंघात 622 किमीचा प्रवास
मराठवाड्यात 28 मतदारसंघात 1069 किमीचा प्रवास
पश्चिम महाराष्ट्रात 29 मतदारसंघात 812 किमीचा प्रवास
कोकणात 15 मतदारसंघात 638 किमीचा प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात, राजनाथ सिंहाच्या उपस्थितीत शुभारंभ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2019 06:24 PM (IST)
संत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या अमरावतीच्या मोझरीमधून महाजनादेश यात्रेचा रथ रवाना झाला आहे. मोझरी ते नंदुरबार असा महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -