मुंबई: राज्यातील 547 ग्रामपंचायतींचा आज निकाल (Grampanchayat Result) जाहीर झाला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बाजी मारल्याचं स्पष्ट झालं असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं दिसून येतंय. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या शिंदे गटाने काही ठिकाणी विजय मिळवला आहे. तर स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबिज केली आहे. 


नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बाजी 


नाशिक (Nashik Election) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये बाजी मारल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवलं आहे. त्यानंतर शिवसेनेने 13 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजपकडे पाच तर काँग्रेसकडे चार ग्रामपंचायती गेल्या आहेत. 


ग्रामपंचायत निकाल अंतिम आकडेवारी 
 
एकूण जागा - 88
राष्ट्रवादी काँग्रेस -41
शिवसेना- 13
भाजप -05
काँगेस -04
-माकप- 08
शिदेगट -01
इतर - 16


पुण्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व 


पुणे जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे 30 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर प्रमुख विरोधक भाजपला केवळ तीन ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तर स्थानिक आघाड्यांनी 23 ठिकाणी सत्ता मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. थेट सरपंचपदामध्येही राष्ट्रवादीने 30 ठिकाणी विजय मिळवत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.  पुण्यातील ग्रामीण भागात अजून राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचं या निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे. 


पुणे जिल्ह्यातील अंतिम आकडेवारी


पुणे जिल्हा 61 ग्रामपंचायत (6 बिनविरोध )


राष्ट्रवादी काँग्रेस - 30
भाजप - 3
शिवसेना - 2
शिंदे गट - 3
काँग्रेस - 00
स्थानिक आघाडी - 23


यवतमाळमध्ये दिग्गजांनी राखले गड


यवतमाळ (Yavatmal Election) जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. जिल्ह्यातील 70 पैकी 33 ग्रामपंचायती काँग्रेसचे हाती आल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपापल्या भागातील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले असून निकालानंतर विजयी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतीपैकी पांढकरवडा तालुक्यातील आसोली तसेच राळेगाव तालुक्यातील भिमसेनपुर या दोन ग्रामपंचायती आधीच विनविरोध झाल्या. उर्वरीत 70 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवाय राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरची ही पहिलीची निवडणूक होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची लिटमस्ट टेस्ट म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. या निवडणुकीत काँग्रेसने चांगले कमबॅक केले आहे. 33 ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली आहे. भाजप दुसर्‍या क्रंमाकावर असून 20 ठिकाणी सरपंच विजयी झाले आहे. तिसर्‍या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. शिवसेनेला तीन, मनसे एक तर स्थानिक आघाडींनी सहा ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचे कार्येकर्त, पदाधिकारी तसेच विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष केला.


एकूण ग्रामपंचायत-72 सर्व निकाल


शिवसेना - 03
शिंदे गट - 00
भाजप- 20
राष्ट्रवादी- 09
काँग्रेस- 33
मनसे - 1
स्थानिक -6


जळगावात शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सरशी


जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे (Election News) निकाल आज हाती आले. भाजप आणि काँग्रेसला या 13 पैकी एकाही जागेवर सत्ता मिळाली नाही. जळगाव जिल्ह्यातील  चोपडा तालुक्यातील 11 तर यावल तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.  थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह मोठा होता. सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व देखील आलं होतं. 


एकूण ग्रामपंचायत- 13


शिवसेना - 03 
शिंदे गट - 03
भाजप- 00
राष्ट्रवादी- 03
काँग्रेस- 00
अपक्ष -04


धुळ्यात भाजपचं निर्विवाद यश, 33 पैकी 32 ग्रामपंचायतींवर कमळ


राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule) जिल्ह्यात भाजपने (BJP) निर्विवाद यश संपादित केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे (Grampanchayat Election) निकाल हाती आले असून 33 पैकी 32 जागांवर भाजपने कमळ फुलविले आहे. तर फक्त राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 


ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे


जिल्हा - धुळे 


तालुका शिरपूर


एकुण ग्रामपंचायत- 33
शिवसेना - 00
शिंदे गट - 00
भाजप- 32
राष्ट्रवादी- 01
काँग्रेस- 00
इतर- 00


अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व 


अहमदनगर जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून त्यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत 20 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपने 16 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली आहे. 


एकुण ग्रामपंचायती- 45


शिवसेना - 00
भाजप- 16
राष्ट्रवादी- 20
काँग्रेस- 00
स्थानिक आघाडी/इतर-09


कोल्हापुरात राष्ट्रवादीची बाजी 


कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील एकमेव कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने बाजी मारली. तालुक्यातील पिंपळगाव खूर्दमध्ये मंडलिक-मुश्रीफ गटाने निर्विवाद विजय मिळवला. थेट सरपंच निवडणुकीमध्ये मुश्रीफ गटाच्या शीतल नवाळे यांनी 398 मतांनी विजय मिळवला. ग्रामपंचायतीमध्ये मुश्रीफ-मंडलिक गटाचे 8 तर 3 जागांवर घाटगे गटाचे उमेदवार विजयी झाले. 


नंदुरबारमध्ये भाजपचे वर्चस्व, 75 पैकी 42 ग्रामपंचायतींवर कमळ


राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नंदुरबारमध्ये (Nandurbar Grampanchayat Elction) भाजपने (BJP)  बाजी मारली आहे. नंदुरबारमध्ये  झालेल्या 75 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 42 ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे.  तर शिवसेना (शिंदेगट) (Shivsena) 28, अपक्ष 4  व राष्ट्रवादी 1(NCP) आणि लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहे.