Maharashtra Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीमध्ये सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आज विविध एक्झिट पोल समोर आले आहेत. टीव्ही नाईनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. अर्थात हे एक्झिट पोल आहेत. अंतिम निकाल हा चार जून रोजी स्पष्ट होणार आहे.






टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये शाहू महाराज आघाडीवर आहेत. राज्यांमध्ये करण्यात आलेल्या एबीपीमध्ये महाविकास आघाडीवर असल्यास दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज एबीपी सीव्होटर एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील असा अंदाज आहे. राज्यामध्ये भाजपकडून 28 जागा लढवल्या गेल्या होत्या. यामध्ये 17 जागा भाजपला मिळतील, अशी चिन्हे आहेत. शिंदे गटाने 15 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये सहा जागा जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून अवघ्या चार जागा लढवण्यात आल्या होत्या. त्यांच्या वाट्याला अवघी एक जागा जात असल्याचे चिन्ह आहे.


त्यामुळे राज्यात महायुतीला महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला लढवलेल्या 21 पैकी 9 जागा मिळतील अशी चिन्हे आहेत. काँग्रेसला 17 पैकी 8 जागा मिळतील अशी चिन्हे आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहापैकी 6 जागा मिळतील असा एक्झिट पोल कल आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या