मुंबई : लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपलं असून सर्वात मोठा, सी व्होटर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसणार आहे तर महाविकास आघाडीने चांगली मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. राज्यात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


लोकसभेसाठी मतदान संपलं असून निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. आता लोकसभेच्या सर्व जागांचा अंदाज हाती आला आहे. महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं सी व्होटर सर्वेमधून स्पष्ट होतंय. 




(ABP Cvoter Exit Poll 2024)


महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी


गेल्या निवडणुकीचा विचार करता भाजप आणि शिवसेनेला 42 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आगाडीला उर्वरित 8 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आणि शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्यात भाजप-शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी महाविकास आघाडी असे दोन गट पडले. 


राज्यात महाविकास आघाडीने सर्व म्हणजे 48 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने सर्वाधिक म्हणजे 21 जागा लढवल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसने 17 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्या. 


एबीपी सी व्होटरच्या सर्वेमध्ये  महाविकास आघाडीला राज्यात 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत महाविकास आघाडीला थेट 16 ते 18 जागा जास्त मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 


त्याचवेळी भाजप-शिंदे आणि अजितदादांच्या महायुतीला 22 ते 26 जागा मिळणार असून त्यांना 16 ते 20 जागांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


सुरुवातीला 328 जागांचा एक्झिट पोल हाती आला, त्यामध्ये इंडिया आघाडीला 97 ते 118 जागा तर एनडीएला 187 ते 226 जागा मिळतील असा दावा केला गेला.


कोण किती जागा लढल्या ?


भाजप - 28
एकनाथ शिंदे - 15 
अजित पवार - 4
महादेव जानकर - 1
----------------


उद्धव ठाकरे - 21
काँग्रेस - 17
शरद पवार - 10


 
(Disclaimer : ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)