राज ठाकरे यांनी अवघ्या एका शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनाकलनीय, या शब्दात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं आहे. राज ठाकरेंनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उतरवले नाहीत. मात्र मोदी-शाह जोडीविरोधात महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेत, विरोधाचं वातावरण तयार केलं होतं. "लाव रे तो व्हिडीओ", असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपच्या अनेक योजनांची पोलखोल केली. या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसंच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये चित्र संपूर्णपणे वेगळं दिसलं.
परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड, सातारा, बारामती वगळता इतर सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उलट राज्यात महायुतीच्या 41 आणि देशभरात एनडीए 345 जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यातच राज्यात निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंची काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.