Maharashtra Election Exit Polls Results 2024 मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदान पार पडलं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आले होते. अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा गट महायुतीत सहभागी झाला. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आल्यानंतर ते महायुतीतून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या,भाजपनं 148 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 85 जागा लढवल्या तर मित्रपक्षांना 4 जागा सोडण्यात आल्या. आता विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. एक्झिट पोलचे अंदाज समोर येत असून यामध्ये बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज महायुतीचं सरकार येईल, असा आहे. मात्र, यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी कशी आहे, हे पाहावं लागेल.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये किती जागांचा अंदाज?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेप्रमाणं विधानसभेला देखील महायुतीत कमी जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेला 4 जागा लढवल्या होत्या. तर, महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या. एक्झिट पोल करणाऱ्या विविध संस्थांचे अंदाज पाहिले असता अजित पवारांच्या आमदारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची संख्या 40 पेक्षा अधिक होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळण्याचा अंदाज?
चाणक्य स्ट्रॅटेजीज : 22+
पोल डायरी : 18-28
इलेक्टोरल एज : 14
मॅट्रिझ : 17-26
दैनिक भास्कर : 15-20
लोकशाही रुद्र : 18-22
एक्झिट पोलनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फटका?
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार पैकी 1 जागा मिळाली होती. आता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होताना दिसत आहे. अजित पवार यांनी ज्यांना उमेदवार दिले त्यामध्ये बहुतांश उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यामुळं जर एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी होताना दिसत आहे. त्यामुळं एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांना पराभव स्वीकारावा लागू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसला पोल डायरीनं सर्वाधिक जागा 18-28 च्या दरम्यान दाखवल्या आहेत. तर, मॅट्रिझनं 17-26 जागा राष्ट्रवादीला दाखवल्या आहेत. इलेक्ट्रोल एजनं सर्वात कमी जागा राष्ट्रवादीला दाखवल्या आहेत. राष्ट्रवादीला 14 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इतर बातम्या :