अहमदनगर : राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात यंदाही चुरशीची लढत होत आहे, विद्यमान आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात थेट लढत होत असून दोन्ही नेते पूर्ण ताकदिनीशी यंदाच्या निवडणुकीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या विजयासाठी सर्वकाही असाच चंग नेतेमंडळींनी बांधल्याचं दिसून येत आहे, त्यातच मतदानाच्या आदल्यादिवशीच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासाठी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरला झाला होता. त्यानंतर, आज रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसेवाटप केल्याचा आरोप करत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे, येथील मतदारासंघात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यातील 288 मतदारसंघातील निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून अनेक मतदारसंघात वादावादी, ईव्हीएममध्ये बिघाड आणि तत्सम घटना समोर येत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या नातेवाईकांकडून पैसे वाटप केल्याचा दावा करत आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. रोहित पवार समर्थकांनी कर्जत येथील एका हॉटेलमधून संबंधित व्यक्तीला लाखो रुपयांच्या रोकडसह पकडले आहे. खांडेकर नावाच्या व्यक्तीकडे लाखो रुपयांची रोकड आणि काही याद्या मिळून आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.दरम्यान, येथील हॉटेलमध्ये नोटांचे बंडल दिसून येत असून पैशासह पकडलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे, मतदारसंघातील वातावरण चांगलंच चिघळलं आहे. विशेष म्हणजे कालच राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पवारांशी संबंधित व्यक्तीने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता.
रोहित पवारांनी पैसै वाटल्याचाही आरोप
जामखेड तालुक्यातील नान्नज या गावात रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीतील कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा दावा राम शिंदे समर्थकांनी केला आहे. नान्नज गावात मधुकर मोहिते हा व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला. या व्यक्तीकडे काही पैसे आणि एक यादी मिळून आली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली असून संबंधित व्यक्तीकडे 47 हजार रुपये मिळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, दुसरीकडे संबंधित व्यक्ती हा पैसे वाटप करत नसल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. दरम्यान, मधुकर मोहिते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील करावाई सुरू असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का