Eknath Shinde Resigned मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा (Eknath Shinde Resigned) सुपुर्द केला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), दादा भुसे (Dada Bhuse) देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. 


अजितदादांनी टायमिंग साधलं, फडणवीसांना शिंदेंच्या बाजूला बसवलं-


एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी दाखल होण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहचले होते. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून चर्चा करत होते. एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरुन उठत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या बाजूला बसत होते. मात्र अजित पवार स्वत: बाजूला झाले आणि देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यासाठी जागा दिली. दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा झाल्याची चर्चा रंगली होती आणि याचदरम्यान एकनाथ शिंदेंच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना बसवून अजित पवारांनी योग्य टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दुरावा?


मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली करण्याच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान, या दोन्ही नेत्यांत काहीसा दुरावा असल्याचं दिसलं. या कार्यक्रमातील दृश्य पाहून हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत असल्याचं बोललं जातंय. त्यांची देहबोली पाहून असा दावा केला जातोय. मुख्यमंत्रिपद हे यामागचं मुख्य कारण आहे का?, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.


30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रि‍पदाची घेतली होती शपथ-


शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले होते. 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईत परतले  होते.  यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सुरु असताना महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रिपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.


अजितदादांनी टायमिंग साधलं, फडणवीसांना शिंदेंच्या बाजूला बसवलं, VIDEO:



संबंधित बातमी:


Maharashtra Next CM: नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे...महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण निवडणार?, अखेर नाव आलं समोर, 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार