Ambadas Danve : आमचा कोणताही आमदार फुटणार नाही,  शिंदे गटाकडून चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं. इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांची निवड देखील नियमाप्रमाणे करण्यात आलेली आहे. विधिमंडळाच्या सभागृहाच्या नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. 


शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी भास्कर जाधव आणि प्रतोद पदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही विधानभवनात जात आहोत अशी माहिती देखील अंबादास दानवे म्हणाले. 


 महाविकास आघाडी विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार 


महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ हे शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष 10 असे आहे. तर सभागृहाच्या एक दशांश म्हणजे एकूण 29 सदस्य एका पक्षाचे असणे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक आहे. मात्र यामध्ये  निवडणूक पूर्व आघाडी म्हणून महाविकास आघाडीने निवडणूक लढवल्याने एकत्रित मिळून विरोधी पक्षनेते पद मिळाव यासाठी प्रयत्न महाविकास आघाडीकडून केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीची विनंती मान्य झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरे या नावाची चर्चा विरोधी पक्षनेता म्हणून  सुरू असल्याची  माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार


राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल 57 जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर 16 जागांसह काँग्रेस असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार? भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरेंच्या नावाची वर्णी?