बारामती : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Group) थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली (Deolali Assembly Constituency) आणि दिंडोरी मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) एबी अर्ज पाठवून राष्ट्रवादी अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Group) जोरदार धक्का दिला. देवळालीत राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) आणि दिंडोरीतून धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी शिंदे गटाच्यावतीने अर्ज दाखल करुन अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर आरोप केलाय.
महायुतीत दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आणि देवळालीत आमदार सरोज अहिरे यांना मैदानात उतरवले आहे. महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेत देवळाली आणि दिंडोरीच्या जागेवर शिंदे गटाने दावा केला होता. मात्र जागा वाटपात हे मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे अखेरच्या दिवशी शिंदे गटाने मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एबी फॉर्म चार्टर्ड प्लेनने नाशिकला पाठवले.
शरद पवारांचा गंभीर आरोप
या प्रकारावरून शरद पवारांनी गंभीर आरोप केलाय. शिवसेना उमेदवारांचे एबी फॉर्म हे विमानाने पोहोचवण्यात आले. यापूर्वी असे घडले आहेत का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले की, असा अनेक गोष्टी घडत आहेत. या सरकारचे वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॉर्म पाठवला. आम्ही अनेक जिल्ह्यांमधून ऐकत आहोत, काही अधिकाऱ्यांकडून ऐकत आहोत की, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती असती तर मी याबाबत वाटेल ते केले असते. मात्र माझा स्वभाव आहे की, पूर्ण माहितीशिवाय मी भाष्य करत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, नाशिकमधील प्रकाराची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत विचारणा करण्यात आली आहे. अर्ज देण्यासाठी विमान कोणी आणले, त्यामध्ये कोण होते, कोणत्या उमेदवारांकरिता हे फॉर्म मागविण्यात आले व त्यासाठी किती खर्च आला, असे प्रश्न जिल्हा निवडणूक शाखेला उपस्थित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली असून एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला