मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती (Madhurima Raje) यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्का बसला आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यात उघड नाराजी पाहायला मिळाली. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय राऊत म्हणाले की, हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये सात दिवस भांडलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने सात वेळा घेतली आहे. 2019 साली अपघाताने आम्ही हरलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी सांगितलं होतं की पोटनिवडणुकीत आम्ही आपल्याला पाठिंबा देतो. पण, नंतर ही जागा आम्हाला द्या. पण काँग्रेसने ती जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव आहे. आज त्या जागेत गोंधळ निर्माण झाला आहे. पण ती जागा सहा ते सात वेळा शिवसेनेने जिंकली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे खंदे समर्थक आहोत. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे आम्ही काहीही करणार नाही.  


सरकारने अनेक नियुक्या बेकायदेशीरपणे केल्या


राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अखेर बदली झाली. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. याबाबत संजय राऊत म्हणाले की, सरकारने अनेक नियुक्या बेकायदेशीरपणे केल्या. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत जो अधिकारी निलंबित आहे, ज्या अधिकाऱ्याने विरोधकांचे फोन टॅप केले ते बेकायदेशीरपणे ऐकले, जो अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता, मात्र सरकार बदलताच त्या अधिकाऱ्यावरचे गुन्हे काढून त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचे बक्षीस देण्यात आले. त्यांच्याकडून अनेक राजकीय गैरकृत्य करून घेतले. 


उशीरा का होईना त्यांना शहाणपण आलं


या व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या किती जवळची असाव्या. या व्यक्तीकडे महाराष्ट्रसारख्या राज्याचे निवडणुकीचे सूत्र असू नये, हे आम्ही वारंवार सांगत होतो. अखेर पापाचा घडा भरला आणि निवडणूक आयोगालाच लाज वाटली असावी. हे प्रकरण फार टिकवलं तर निवडणूक आयोगाची उरलीसुरली अब्रू सुद्धा धुळीत मिळेल. म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताईंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावरून बदली करण्यात आली. आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत. उशीरा का होईना त्यांना शहाणपण आलं. गृहमंत्र्यांना कळत नाही की कोणाला महासंचालक पदावर रुजू करावं. अजूनही निवडणूक पारदर्शक होईल अशी खात्री वाटतं नाही. रस्त्यावर नागरिकांना त्रास दिला जातोय, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"