कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी कोल्हापूरमध्ये अभुतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. हा सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापूर्वी अर्धा तास अगोदर या घडामोडी घडल्या. त्यामुळे सतेज पाटील यांना शेवटच्या क्षणी हताशपणे पाहत राहण्याशिवाय फार काही करता आले नाही. या प्रकारानंतर सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला असला तरी मधुरिमाराजे यांची शेवटच्या क्षणी माघार घेण्याची खेळी त्यांच्या फारच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. यानंतर सतेज पाटील यांना त्यांच्या अजिंक्यतारा या कार्यालयाबाहेर आपल्या समर्थकांसमोर बोलताना अक्षरश: रडू कोसळले


एरवी सतेज पाटील म्हटले की, कोल्हापूरचा रांगडा नेता, साम-दाम-दंड-भेद यापैकी कोणत्याही मार्गाने आपले राजकीय ईप्सित साध्य करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. मात्र, सोमवारी कोल्हापूरमध्ये त्यांच्या मनाचा हळवा कोपरा सर्वांना पाहायला मिळाला. मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या पंजावर लढणारा उमेदवार रिंगणात नाही. ही गोष्ट सतेज पाटील यांच्या मनाला चांगलीच लागली. त्यामुळे सतेज पाटील यांना अजिंक्यतारापाशी आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना रडू आवरले नाही. सतेज पाटील इतके भावूक झाले होते की, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. 'जे काही घडलं, तुमच्या सगळ्यांसमोर आहे. माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नाही', एवढी दोन वाक्य बोलल्यानंतर सतेज पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बोलणे मुश्कील झाल्यामुळे ते पुन्हा खाली बसले. त्यावेळी आजुबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले.


2 वाजून 36 मिनीटांनी मालोजीराजेंचा फोन आला अन्.... सतेज पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी


सतेज पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मधुरिमाराजे यांनी उमेदवारी का आणि कशी मागे घेतली, याबाबत सगळा घटनाक्रम सांगितला. काल दुपारपासून माझी कोणाशी भेट होऊ शकली नव्हती. हे सगळं घडल्यावर भुदरगडमध्ये  राहुल देसाईंचा काँग्रेस प्रवेश होता. गेले पाच ते सहा महिने मी त्यांना काँग्रेसमध्ये या म्हणून सांगत होतो. त्यांनी 5 ते 6 हजार लोकांचा मेळावा बोलावला होता. मी त्याठिकाणी न जाऊन त्यांचं खच्चीकरण करणे बरोबर नव्हते. त्यामुळे मी दुपारी घटना घडल्यानंतर त्याठिकाणी गेलो. जे काही घडलं ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे. मी त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणार नाही. जे घडलं आहे, त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य तुम्ही मला द्यावं, अशी माझी विनंती आहे, असे सतेज पाटील यांनी म्हटले.


पद, पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा तुमच्या सारखी माणसं माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. आज देखील या प्रसंगाला सामोरे जाताना धाडस होतं नाही. मला 2 वाजून 36 मिनीटांनी मालोजीराजेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, माघार घेणार आहे. मी म्हटलं असा निर्णय घेऊ नका. कारण एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेऊन दिली आहे. मी म्हणालो, काहीही संकट असू द्या, असा निर्णय घेऊ नका. शेवटी ज्यावेळी निवडणूक लागते, त्यावेळी ताकदीने निवडणुकीत उतरत असतो. तुम्हाला विश्वास देतो, कसलीही काळजी करु नका. तुम्हाला काही झालं तर जबाबदार बंटी पाटील असेल. त्यानंतर मी फोन बंद केला आणि ताबडतोब कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथून पुढचा व्हिडीओ आपल्याकडे आलेला आहे. ती स्थिती माझ्या हातात नव्हती. मला अनावर आलं होतं. काय घडतंय मलाच समजत नव्हतं. त्यांचा हात धरुन थांबवणे मलाच संयुक्तिक वाटत नव्हतं. जे घडलं ते लोकांसमोर होतं. माझ्या हातून एखादं वाक्य जाऊ नये म्हणून लोकांना गाडीत बसायला सांगितलं. मला त्यांनी निर्णय का घेतला माहिती नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले.



आणखी वाचा


शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!