मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून (Kalyan Rural Assembly Constituency) मनसेचे (MNS) विद्यमान आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला मनसे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होणार होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाने या जागेवर उमेदवार दिल्यामुळे आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मनसेचे पदाधिकारी अंबरनाथमध्ये थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.
अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाने आमदार बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. मात्र शिवसेना शिंदे गटाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने आता मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना मदत करणार : राजू पाटील
त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी यांनी अंबरनाथमधील एका कार्यक्रमात बोलताना राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. त्यात अंबरनाथमध्ये मनसेचा उमेदवारही नाही. त्यामुळे मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, असे वक्तव्य केले. तर अंबरनाथचे ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले यशवंत किल्लेदार?
तर राजू पाटील यांच्या भूमिकेबाबत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे की, राजू पाटील यांनी अंबरनाथ येथील उबाठा गटाचे उमेदवार राजेश वानखडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. त्याचं कारणच हे आहे की, त्या वेळेला केवळ आणि केवळ राज साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी श्रीकांतला मदत केली होती. त्यांची इच्छा नसतानाही श्रीकांतला पूर्ण पाठिंबा दिला आणि आता राजू पाटील यांच्या विरोधातच एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. हा एक प्रकारचा अन्यायच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता मनसेच्या भूमिकेमुळे अंबरनाथमध्ये शिंदे गटाची अडचण वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा