नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून महायुतीत भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या नावाचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. यानंतर आता देवयानी फरांदे 24 नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले (Rahul Dhikle), नाशिक पश्चिममधून सीमा हिरे (Seema Hiray), बागलाणमधून दिलीप बोरसे (Dilip Borse), चांदवडमधून डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे मात्र वेटिंगवर आहेत. देवयानी फरांदे यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
देवयानी फरांदेंचे सागर बंगल्यावर शक्तिप्रदर्शन
यानंतर आज देवयानी फरांदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. 24 नगरसेवकांसोबत देवयानी फरांदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. सागर बंगल्यावर देवयानी फरांदे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून भाजपची दुसरी यादी येण्यापूर्वी देवयानी फरांदे यांच्याकडून आपले तिकीट फिक्स करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि देवयानी फरांदे यांच्यात नेमकी काय चर्चा होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राहुल आहेर - केदा आहेर देखील फडणवीसांची घेणार भेट
दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र तीन दिवसांपूर्वीच राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे बंधू केदा आहेर यांच्या उमेदवारी देण्याची शिफारस राहुल आहेर यांनी केली होती. मात्र भाजपच्या यादीत राहुल आहेर यांचे नाव आल्याने आहेर बंधू आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आता चांदवडमधून राहुल आहेर की केदा आहेर? कुणाला तिकीट मिळणार? याचा फैसला देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात होणार आहे. देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा