नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता समीर भुजबळांच्या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 


राज्याचे लक्ष लागलेल्या नांदगाव मतदारसंघात आज माजी खासदार समीर भुजबळ हे आपला नामनिर्देशन अर्ज दाखल करत आहेत. समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नांदगाव शहरातून रॅली काढली. भयमुक्त नांदगाव, विकसित नांदगाव ही संकल्पना घेवून माझी उमेदवारी असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट ) पदाधिकारी, समता परिषद कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. 


काय म्हणाले छगन भुजबळ? 


तर समीर भुजबळ यांच्या भूमिकेबाबत छगन भुजबळ म्हणाले की, महायुतीचे सर्व पक्ष हे समीर भुजबळ यांनाच साथ देतील. आज त्यांच्या रॅलीत जेवढी गर्दी आहे तेवढीच मतांच्या मतपेटीत तुम्हाला पाहायला मिळेल. महायुतीचा विषय आणि नांदगाव विधानसभेचा विषय वेगळा आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्ष समीर भुजबळ यांचे काम करणार आहेत. कारण सध्या नांदगाव भीतीच्या छायेखाली आहे. अवैध धंदे तिथं आहेत. हे सगळं बंद करायचं आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांना सर्वजण मदत करणार, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे सुहास कांदे यांच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर येवला विधानसभा मतदारसंघात थांबण्याची मला गरज वाटत नाही. कारण यावेळी 30 ते 35 हजारांच्या लीडने मी निवडून येईल, असा विश्वास देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट


Maharashtra Assembly Elections 2024 : '50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला, अशी ब्रेकींग 23 तारखेला लागली पाहिजे', विखे पाटलांच्या होमग्राउंडवर निलेश लंके गरजले