पुणे: आज भाऊबीज निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे भेटण्याची किंवा एकत्र येण्याची शक्यताही कमी झाल्याचं दिसून येत आहे. कारण अजित पवारांनी बारामतीत दौरा आणि इतर कार्यक्रम आखलेला आहे. जवळपास 12 ते 13 तास अजित पवार दौऱ्यावर असणार आहेत. पक्ष फुटीनंतर अनेकदा पवार कुटूंबातील व्यक्तींकडून राजकीय मतभेद असले तरीही पवार कुटुंब एक राहील, असं म्हटलं जात. मात्र, प्रत्यक्षात मात्र वेगळं चित्र दिसत असल्याने आणि पाडवा वेगळा घेतल्याने आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित भेटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शरद पवार आणि अजित पवार आज भेटतील याची शक्यता जवळपास धूसर झाली आहे. शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत. तर अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची एकत्रित भाऊबीज पार पडली नाही, ते आज भेटण्याची शक्यता देखील कमी आहे, त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, यावेळची बारामतीची परिस्थिती वेगळी आहे, थोडी ताणतणावाची आहे. आपण सर्वांनी अशी अपेक्षा करूया किंवा अशा करूया त्यांनी (सुप्रिया सुळे-अजित पवार) संध्याकाळपर्यंत एकत्रित यावं. नाही संध्याकाळपर्यंत एकत्रित आले, तर निदान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला त्यांनी एकत्रित आलं पाहिजे. राजकीय त्यांच्या विचार काहीही असू शकतात परंतु जर पवार साहेबांनी सांगितलं तर मी कुटुंब फुटू देणार नाही त्याचा विचार सर्व पवारांनी करावा, असं छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणालेत.
अजित पवार बारामती गावभेट दौऱ्यावर
अजित पवारांनी आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा आखला आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत अजित पवार बारामती तालुक्यातील 27 गावांना भेटी देणार आहेत. दोन दिवस आधी अजित पवारांनी बारामतीतील 59 गावांचा दौरा आखला होता. परंतु चुकीच्या नियोजनामुळे त्यांनी 29 गावांचा दौरा केला. पुन्हा एकदा आज अजित पवार 27 गावांचा दौरा करणार आहेत. भाऊबीजेच्या निमित्त सुप्रिया सुळे यांना अजित पवार भेटणार का हा प्रश्न विचारला जात असतानाच अजित पवारांनी हा दौरा केल्याने अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमित्त भेटणार नसल्याचं या दौऱ्यावरून तरी प्रथम दर्शनी दिसते आहे.
लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा
बारामती दौऱ्यावर असताना सावळ गावात बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसं वाटलं असतं, म्हणून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा. साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल असे अजित पवार म्हणालेत. अजित पवार आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत करीत आहेत. बारामती तालुक्यातील सावळ गावात अजित पवार बोलत होते.
शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर
आज शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधानसभेचे देखील तिकीट देण्यात आलं. त्यानंतर शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते मंडळींनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवाराला विरोध केला आणि तिसरी आघाडी तयार केली. प्रवीण माने यांनी पक्षातून बंडखोरी केली. या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार इंदापूर तालुक्यातील चार कुटुंबाची भेट घेणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला इंदापूरच्या शहा कुटुंबियांनी विरोध केला होता. त्यांच्या घरी जाऊन शरद पवार कशी त्यांची नाराजी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI