नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणुकीच्या तारखेची उत्सुकता लागली होती. परंतु ही पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. मात्र साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी हा धक्का समजला जात आहे.


महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेसह, विविध राज्यांमधील 64 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुका आज (21 सप्टेंबर) जाहीर झाल्या. या पोटनिवडणुकीचं मतदान आणि निकाल महाराष्ट्र तसंच हरियाणाच्या वेळापत्रकानुसार होणार आहे. परंतु या क्षणाला साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होत नाही, असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे साताऱ्याची जागा रिक्त झाली होती. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होईल, याच अटीवर उदयनराजे यांनी  भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात होतं. ज्या ज्या वेळी लोकसभेचा राजीनामा होतो, त्यावेळी नजीकच्या विधानसभेसोबत ही पोटनिवडणूक होते, असं मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं होतं.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्यासाठी दिल्लीमध्ये मध्यरात्री खलबतं सुरु होती. लोकसभा अध्यक्षांनी रात्री दोन वाजता त्यांचा राजीनामा स्वीकारला. विधानसभा आणि साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक सोबत व्हावी, हा उद्देश या धावपळीमागे होता असं म्हटलं जात होतं. तसंच पोटनिवडणुकीत वेगळे निकाल येतील अशी भीतीही उदयनराजेंना असावी, अशीही चर्चा होती. त्यामुळे साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर पडणं हा उदयनराजेंसाठी धक्का समजला जात आहे.

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल
विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार या मिलियन डॉलर प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

संबंधित बातम्या