Maharashtra Assembly Election Result Solapur: लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येकाला शरद पवार यांची तुतारी हाती घ्यायची इच्छा होती.संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीमधील तुतारीला सर्वात जास्त मागणी असताना कालच्या निकालात मात्र जसे महाविकास आघाडीचे पानिपत झाल्याचे दिसले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराची धूळ उडवून देणाऱ्या शरद पवारांच्या खात्यात केवळ दहा जागा जमा झाल्या. यात 10 पैकी चार जागा त्यांना एकट्या सोलापूर जिल्ह्याने देत शरद पवारांची इभ्रत राखली. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या गटाला 55 ते 60 जागा मिळतील अशी अपेक्षा खुद्द पवारांनाही होती.मात्र पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभ्या असणाऱ्या अनेक दिग्गजांच्या जागा या महायुतीच्या लाटेत बुडल्या.केवळ सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला घसघशीत चार आमदार निवडून देत यश दिले.


माढ्याची लढत महत्वाची ठरली..


टेंभुर्णी येथे माढा आणि मोहोळसाठी सभा घेत शिंदे बंधूंना लोळवत पाडा जेणेकरून हा मेसेज सर्वत्र जाईल असा थेट इशाराही सभेत दिल्यानंतर पवारांनी माढा विधानसभेसाठी त्यांना पडत्या काळात साथ देणाऱ्या अभिजीत पाटील सारख्या तरुणावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली .  यामुळेच केवळ तीन महिने आधी माढ्यात उमेदवारी मागायला आलेल्या पंढरपूरच्या अभिजीत पाटील या तरुणाने तीस वर्षाची सत्ता तीस हजाराच्या मताधिक्याने उलथवून लावल्याचं दिसलं.माढ्याचा फटका करमाळा मतदारसंघातही बसला आणि तेथे गेल्या वेळी निवडून आलेले संजय मामा शिंदे यांना माजी आमदार नारायण पाटील यांनी देखील मोठ्या मताधिक्याने पराभूत केले. राज्यात राष्ट्रवादी फुटल्यानंतर हे दोन्ही शिंदे बंधू यांनी अजित पवारांना साथ दिली होती मात्र नंतर लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर पुन्हा बबन दादा शिंदे यांनी शरद पवारांकडे उमेदवारीसाठी अनेक हेलपाटे घातले.पवारांनी जन्मताच कानोसा घेत अभिजीत पाटील यांच्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवला आणि त्याने तो विश्वास सार्थ केला.


मोहोळ विधानसभेतही मतदारांना तुतारीची भुरळ


अशीच परिस्थिती मोहोळ विधानसभा मतदारसंघात हे दिसून आली. येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एक झाले होते आणि अशावेळी या ठिकाणी राजू खरे हा तरुण चेहरा पवारांनी अखेरच्या क्षणी उतरवला. राजू खरे यांच्या मागे मोहोळ पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर या भागातील मतदारांनी तुतारीसाठी भरभरून मतदान केले आणि पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेला राजू खरे देखील 30 हजाराच्या फरकाने विजयी झाला. पवारांनी टेंभुर्णी येथील घेतलेल्या एका सभेमुळे माढा करमाळा आणि मोहोळ या तीन ठिकाणी सत्तांतर घडवत तिन्ही ठिकाणी तुतारीला विजय मिळवून दिल्याचे दिसले.


माळशिरसला कडव्या विरोधकांमध्ये चुरस


खरी घासून लढत पाहायला मिळाली ती माळशिरस विधानसभा मतदारसंघात , जेथे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोन कडव्या विरोधकांची ताकद एकत्र आली होती. येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर हे पक्षाचे स्टार प्रचारक असल्याने ते मतदारसंघ सोडून राज्यभर पक्षासाठी सभा घेत फिरत होते. अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधणारा म्हणून त्यांची लोकसभेला खूपच चर्चा झाली होती.एका बाजूला उत्तम जानकर राज्यभर सभा घेत असताना त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी मात्र माध्यमांपासून दूर राहत केवळ गावोगावी जाऊन बैठका घेण्यावर जोर धरला होता. त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कालावधीत केवळ एक सभा नितीन गडकरी यांनी अकलूज येथे घेतली होती. मातृ उत्तम जानकर बाहेर प्रचारात अडकलेले पाहून सातपुते यांनी गावोगावी ज्या पद्धतीने बैठका घेतल्या त्याचा परिणाम जवळपास आठव्या फेरीपर्यंत सातपुते यांनी त्यांची आघाडी कायम ठेवली होती. मात्र मोहिते-पाटील यांच्या अकलूज परिसरातील मतमोजणी सुरू झाल्यावर पुन्हा राम सातपुते हे जुनं लीड तोडून जवळपास 13000 मतांनी विजयी झाले. 


खरे तर राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने येणारी जागा म्हणून माळशिरस राखीव मतदारसंघाकडे पाहिले जात होते. मात्र राम सातपुते यांनी यावेळी ज्या पद्धतीने सायलेंट राहत प्रचार केला त्याचा खूप मोठा फायदा सातपुते यांना मिळाला. अखेर मोहिते पाटलांच्या अकलूज भागाने लाज राखत शरद पवारांचीही चौथी जागा निवडून आणली. 


सोलापूरात चार जागा पवारांच्याच सोबत


एकंदर सोलापूर आणि शरद पवार हे फार जुने नाते असून पवारांच्या कारकिर्दीत ते पहिल्यांदाच सोलापूरचे पालकमंत्री होते. तेव्हापासून पवारांनी या जिल्ह्यात त्यांची खास टीम तयार केली होती जी आजही पवारांच्या सोबत आहे. कालच्या निकालात एका बाजूला पवार गटाला राज्यात केवळ दहा जागा मिळत असताना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याने मात्र चार जागा निवडून देत आपण पवारांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. याच पद्धतीने सांगोल्याची जागा ही गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबात द्यावी ही त्यांची सुरुवातीपासून भूमिका होती. मात्र अखेरच्या क्षणी जागा वाटपात उद्धव ठाकरे गटाने ही जागा आपल्याकडे ठेवल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत झाली होती. तरीही अखेर पवारांच्या मनाप्रमाणे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीच शहाजी बापू पाटील यांना धूळ चारत इथे विजय मिळवला. 


शहाजी बापू पाटील यांना दे धक्का


पवारांच्या टीमने तसे पाहिले तर पाच दिग्गज आमदारांना धूळ चारत त्यांची सत्ता उलथून लावली. शरद पवारांच्या एका सभेचा फायदा माढा करमाळा मोहोळ आणि सांगोल्याला झाला असला तरी पंढरपुरात मात्र पवारांच्या उमेदवाराचे डिपॉझिट ही जप्त झाल. कालच्या निकालात शरद पवारांनी आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत तात्या माने आमदार राम सातपुते आणि आमदार शहाजी बापू पाटील यांना दे धक्का दिला.