मुंबई: निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह हरयाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार, २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला जनतेचा कौल स्पष्ट होईल. मात्र, त्यापूर्वी जनमताचा कल 'एबीपी माझा'-'सी व्होटर'च्या ताज्या सर्वेक्षणात समोर आलाय. त्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भाजपला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होताना दिसतेय. विशेष म्हणजे भाजप यंदा १४४ जागांसह स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत आहे. दुसरीकडे, शिवसेनेसाठी सर्वेक्षणाचे कल चिंता वाढवणारे आहेत. कारण, गेल्या खेपेस स्वबळावर ६३ जागा मिळवणारी शिवसेना यंदाही वेगळी लढल्यास फक्त ३९ जागा मिळवेल असं दिसतंय. मात्र, महायुती झाल्यास शिवसेनेलाही लाभ मिळून २०५ जागांसह भाजप-सेना सहज सत्तास्थापन करू शकतील. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र यंदाही जनता विरोधी बाकांवर बसवणार असल्याचं चित्र आहे.
'एबीपी माझा' आणि 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणातून समोर आलेला हा आहे कौल मराठी मनाचा-
यंदा विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?
स्वतंत्र लढल्यास -
भाजप - १४४
शिवसेना - ३९
काँग्रेस - २१
राष्ट्रवादी काँग्रेस - २०
मनसे - ००
इतर - ६४
महायुती आणि महाआघाडी झाल्यास
महायुती - २०५
महाआघाडी - ५५
इतर - २८
वंचित बहुजन आघाडीचा पुन्हा 'दे धक्का'?
'पुढचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब आंबेडकर असतील', या शब्दात खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच गांभीर्यानं घेतलेली, अॅड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आश्चर्याचे धक्के देऊ शकते. युत्या-आघाड्यांची गणितं जमली किंवा फिस्कटली तरी वंबआ यंदा विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास तब्बल ६४ जागा अन्य पक्षांना मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे, ते पाहता वंबआकडे सर्वांच्याच नजरा असतील. मनसेनं कालच निवडणुका लढवण्याचं जाहीर केल्यानं, त्यांच्याबद्दल वर्तवलेला अंदाज हा त्यांच्या घोषणेपूर्वीचा आहे.
दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियताही कायम राहिल्याचं दिसून येत आहे. ३८.६ टक्के मतांवर फडणवीस हे मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी तुमची पसंती कुणाला
देवेंद्र फडणवीस - ३८.६ टक्के
नितीन गडकरी - ७.१ टक्के
अजित पवार - ६ टक्के
उद्धव ठाकरे - ५.६ टक्के
अशोक चव्हाण - ४.९ टक्के
शरद पवार- ४.७ टक्के
राज ठाकरे - ४.७ टक्के
पृथ्वीराज चव्हाण - ३.२ टक्के
इतर - ९.९ टक्के
सांगता येत नाही - १५.३ टक्के
स्वतंत्र लढल्यास भाजप 144, सेना 39, महायुती झाल्यास 205 जागा; एबीपी माझा-सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्राचा कल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Sep 2019 06:01 PM (IST)
महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकतो असा कल एबीपी माझा-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आलाय. विशेष म्हणजे भाजपची स्थिती २०१४च्या तुलनेत अधिक भक्कम झाली असून स्वतंत्र लढल्यास १४४ तर महायुती झाल्यास २०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी मात्र स्थिती अनुकूल नसून महायुतीत राहणंच त्या पक्षाला सोयीचं ठरू शकतं. विरोधकांना मात्र महाराष्ट्रानं पुन्हा नाकारल्याचं प्राथमिक चित्र आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -