Sunil Tatkare on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी काल माढ्यातील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाची खिल्ली उडवली होती. आता जगातला एकमेव पक्ष ज्याला आपल्या चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहावे लागते असा टोला जयंत पाटलांनी लगावला होता. आता त्यांच्या या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रत्युत्तर दिलं. करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचा यंदा करेक्ट कार्यक्रम होईल असा टोला लगावला.


माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाच्या मूनल साठे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सभा माढ्यात पार पडली. सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जयंत पाटील हे 1999 सालापासून घड्याळ चिन्हावर जिंकले आहेत. याची जाणीव त्यांनी ठेवावी असे सांगत जयंत पाटलांचा यंदा करेक्ट कार्यक्रम होणार असा दावा तटकरेंनी केला. जयंत पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची दिवा स्वप्ने पडू लागली आहेत.  मात्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं वातावरण बदलत चाललंय त्यामुळेच त्यांना घड्याळ चिन्हाचे इतके भय वाटू लागल्याचा टोलाही तटकरे यांनी लगावला. जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका करताना जयंत पाटील हे आतल्या गाठीचे असून त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असते असा टोलाही लगावला.


माढा विधानसभा मतदारसंघातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी आलो


माढा विधानसभा मतदारसंघात समज आणि गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष म्हणून माढा मतदारसंघात येणं माझं कर्तव्य होतं म्हणू,न मी इथं आलो असल्याचे मत खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.  सर्वांनी आपल्या अधिकृत उमेदवार मिनल साठे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहावे असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून मिनल साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं माढ्याची लढत ही रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


 


महत्वाच्या बातम्या:


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, अमित शाह यांचे संकेत, जयंत पाटील म्हणाले एकनाथ शिंदे आणि अजितदादा विचार करतील