Maharashtra Assembly Election 2024 : श्रीरामपूर हा नगर जिल्ह्याच्या राजकारणातला महत्वाचा मतदार संघ मानला जातो. सध्या महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये श्रीरामपूरच्या जागेवरुन वाद सुरु आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या श्रीरामपूर विधानसभेवर कोण झेंडा फडकवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे डॉ. लहु कानडे हे सध्या श्रीरामपूरचे विद्यमान आमदार असले तरी लोकसभेत महायुतीला मिळालेले लीड पाहून त्यांच्यासाठीही ही लढाई सोपी नसेल, तसेच पक्षांतर्गत बंडखोरीचाही फटका बसण्याची शक्यता आहे.


सध्या श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे काँग्रसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. कॉंग्रेसमधील देशपातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक  आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या ऐवजी मला उमेदवारी द्यावी अशी मागणी हेमंत ओगले यांनी केले आहे. उमेदवारी न मिळाल्यास हेमंत ओगले वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.


दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गट आणि भाजप श्रीरामपूर विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. शिंदे गटातील नेते युती माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे.  


याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीरामपूरमध्ये काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे लहू कानडे 93,906 मतांनी विजयी झाले, तर शिवसेना पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे 18,994 मतांनी पराभूत झाले होते.