Mahesh Sawant Shivsen UBT Candidate : मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. महेश सावंत यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांचं आव्हान असेल. महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसैनिक ते विधानसभेचे उमेदवार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. महेश सावंत सध्या दादर-माहीमचे विभागप्रमुख आहेत. 


कोण आहेत महेश सावंत?


शिवसेनेत बंड झाल्यानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. महेश सावंत 1990 पासून शिवसेनेत सक्रीय आहेत.महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत कार्यरत होते. सावंत यांची ओळख माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक अशी होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता. मात्र, महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले.


2017 ला अपक्ष उमेदवारी


मुंबई महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेकडून सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी उमेदवारी न मिळाल्यानं महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत महेश सावंत यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. 


शिवसेनेतील बंडावेळी ठाकरेंना साथ


एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरेंची साथ सोडली. याच काळात माहीम दादरची  जबाबदारी महेश सावंत यांच्यावर देण्यात आली. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रभादेवीमध्ये राडा झाला होता. त्यावेळी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यात संघर्ष झाला होता.  


ठाकरेंकडून विधानसभेची उमेदवारी


शिवसेना ठाकरे गटाकडून माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे. माहीम विधानसभेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


उमेदवारी जाहीर झाल्यावर सावंत काय म्हणाले?


महेश सावंत यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्वजण मेहनत घेत दादर माहीमवर शिवसेनेचा  भगवा डौलानं फडकावणार असल्याचं म्हटलं. किती जणांचं आव्हान असलं तरी जनतेला रोज भेटणारा, रात्री अपरात्री भेटणारा उमेदवार जनतेला भेटला आहे. बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना जशी काम करते तसं काम करणार आहोत. माहीममध्ये विजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होणार आहे, असं महेश सावंत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी आम्हाला एक दिलानं काम करण्याचा मंत्र दिला आहे, असं महेश सावंत म्हणाले. आज उमेदवारी जाहीर झालीय मात्र यापूर्वी शिवसेना म्हणून काम करतोय, असं सावंत म्हणाले. साहेबांनी लढ म्हणून सांगितलं, आम्ही जिंकून येथे येणार असं महेश सावंत म्हणाले.  



इतर बातम्या : 


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरेंचं आव्हान वाटत नाही, उद्धव साहेबांनी आदेश दिलाय, आता जिंकूनच मातोश्रीवर येऊ: महेश सावंत