सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण, पाटणमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोरेगाव, कराड उत्तर आणि फलटण या तीन जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं मविआकडून माण, वाई आणि सातारा या मतदारसंघातील उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. या तीन पैकी दोन मतदारसंघ म्हणजेच माण आणि वाई हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे स्पष्ट आहे. सातारा विधानसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, शेवटच्या टप्प्यात काय निर्णय होणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.


मविआचे साताऱ्यातील पाच उमेदवार जाहीर


सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, फलटण आणि पाटण या मतदारसंघात मविआचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कराड दक्षिणला विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण पुन्हा रिंगणात आहेत. ते काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. पाटण या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पाटणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर देखील इच्छुक आहेत. याशिवाय कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, कोरेगावातून शशिकांत शिंदे आणि फलटणमधून दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


सातारा, वाई अन् माणला मविआचा उमेदवार कोण?


सातारा विधानसभा मतदारसंघ कुणाला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीपक पवार आणि अमित कदम हे इच्छुक आहेत. अमित कदम काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवारांच्या पक्षात दाखल झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत सचिन मोहिते इच्छुक आहेत. जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यास अमित कदम मशाल चिन्हावर लढण्यास देखील तयार असल्याच्या चर्चा आहेत. दीपक पवार यांनी यापूर्वी दोनवेळा या मतदारसंघात निवडणूक लढवली आहे. एकदा ते भाजपच्या आणि एकदा राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले होते.


माणमध्ये तीन दावेदार


माण विधासनभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. या ठिकाणी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप इच्छुक आहेत. या पैकी शरद पवार कुणाला संधी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार विरुद्ध भाजपचे जयकुमार गोरे असा सामना होईल.


वाईमध्ये कुणाला संधी ?


वाई विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भातील देखील अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवारांच्या पक्षाच्या तिसऱ्या यादीत कुणाचं नाव येतं ते पाहावं लागणार आहे. 


दरम्यान, पाटण विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सत्यजितसिंह पाटणकर इच्छुक आहेत. या ठिकाणचा तिढा दोन्ही पक्षांचे नेते कसा सोडवतात हे पाहावं लागेल. 


इतर बातम्या :


उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची तिसरी यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला