मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा होत असताना आता अंतिम याद्यांमधून नावे जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने आज दुसरी यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) मुंबईतील 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर, मलबार हिल या जागेवरुन अद्यापही महाविकास आघाडीत अंतिम निर्णय झाला नसताना, ठाकरे गटाकडून भैरू चौधरी यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आज तिसऱ्या यादीत 3 उमेदवारांची नावे जाहीर झाली असून हे तिन्ही उमेदवार मुंबईतील (Mumbai) आहेत. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागांवर लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्यानुसार, आता उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत.
मुंबईतील जागा वाटपाबाबत मविआत अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. आतापर्यंत महाविकास आघाडीकडून मुंबईतील 24 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून 19 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, काँग्रेसनं 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं एका जागेवर उमेदवार दिली आहे. ठाकरेंकडून आज 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
164 वर्सोवा - हरुन खान
169 घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
167 विलेपार्ले - संदिप नाईक
या तीन नावांवर महाविकास आघाडीत शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील 19 जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत.
आतापर्यंत ठाकरे गट मुंबईतील लढणाऱ्या जागा
1. भायखळा
2. शिवडी
3. वरळी
4. वडाळा
5. दादर माहीम
6. मागाठाणे
7. विक्रोळी
8. भांडुप पश्चिम
9. जोगेश्वरी पूर्व
10. दिंडोशी
11. अंधेरी पूर्व
12. चेंबूर
13. कुर्ला
14. वांद्रे पूर्व
15. कलिना
16. गोरेगाव
17. वर्सोवा
18. घाटकोपर पश्चिम
19. विलेपार्ले
दरम्यान, मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भैरू चौधरी यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे, एकूण 20 जागा शिवसेना ठाकरे गट मुंबईत लढत असल्याचे आत्तापर्यंतच्या यादीनुसार स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसकडून 7 जागांवर उमदेवार जाहीर
काँग्रेसनं मालाड पश्चिम,चांदिवली,मुंबादेवी,धारावी या चार जागांवर उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर, काँग्रेसने आज तीन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे, काँग्रेसच्या 7 जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे.