मुंबई : खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप शिवसेनेच्या 2019 च्या निवडणुकीतील चर्चा, महाविकास आघाडीतील चर्चा, शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा यावर भूमिका मांडली. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला पाच हजार लोक होते, असं म्हटलं. याशिवाय महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनता त्यांच्या भाषणांना कंटाळली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास भाजपचा नकार
महाराष्ट्रासाठी केलं वगैरे या थापा असतात, देवेंद्र फडणवीस यांचं अध:पतन त्यांच्या पक्षानं केलं, एका गद्दारासाठी केलं, अपमानित केलं,असं संजय राऊत म्हणाले. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतील एका गद्दाराला मुख्यमंत्री केलंत पण शिवसेनेबरोबर तुमची 25 वर्ष युती असताना तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, मी त्या चर्चेच्या प्रक्रियेत होतो. ते लोक चर्चा करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रिपदावर चर्चा होणार हे वारंवार सांगितलं जात होतं. आमचं असं मत होतं आपलं जे ठरलंय त्यावर चर्चा व्हायला हवी, असं संजय राऊत म्हणाले.
आमचं सरकार बनतंय हे फडणवीस यांना माहिती नव्हतं : संजय राऊत
आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे करु शकतात, त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केले तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी काय ठरवलं होतं, काय ठरवलं नाही हे माझ्या इतकं कुणाला माहिती नाही. त्या संपूर्ण चर्चेच्या प्रक्रियेत उद्धव ठाकरेंच्या वतीनं संजय राऊत होते. सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेब आणि माझ्या होत होत्या. देवेंद्र फडणवीस यांना काही माहिती नाही, आमचं सरकार बनतंय हे त्यांना माहिती नव्हतं. शिवसेना आपल्या पायाशी येणार अशी त्यांची भूमिका होती पण शिवसेनेला पण राजकारण येतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं. शरद पवार आणि काँग्रेसची महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्रिपद पाच वर्ष टिकवायचं ही कमिटमेंट होती, असं संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या सभेला पाच हजार माणसं : संजय राऊत
नरेंद्र मोदींनी देशाचं काम करावं, कालची शिवाजी पार्कवरील सभा पाहिली असेल तर त्या सभेला पाच हजार माणसंही नव्हती. त्यातील अर्धी माणसं भाड्याची होती. ते आम्हाला मुंबईत येऊन शिवसेना, हिंदुत्व शिकवत असतील तर देशाचं कठीण आहे. निवडणूक झाल्यानंतर ते ब्राझील, मेक्सिको आणि इटलीला जाणार आहेत, ते आम्हाला काय सांगतात, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली. तुम्ही शिवाजी पार्कवरील दृश्य काय होतं ते पाहिलं असेल. मला फार दु:ख झालं, पंतप्रधान येतात आणि त्यांचं स्वागत अशा प्रकारे केलं जातं, सभेला लोक येत नाहीत. याचा अर्थ काय मुंबई, महाराष्ट्राची जनता पंतप्रधानांच्या भाषणाचा कंटाळा आलाय, असं राऊत यांनी म्हटलं.
इतर बातम्या :