Rajesaheb Deshmukh: परळी मतदारसंघात विधानसभा मतदान प्रक्रियेदरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाली होती. याचे पडसाद घाटनांदुर मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. संतप्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सह इतर साहित्याची तोडफोड केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या मुलाने मतदारसंघात दहशत निर्माण केली, असा आरोप केला होता. बुथ फोडल्याप्रकरणी देशमुख पिता-पुत्रावर कारवाई करावी असंही म्हटलं होतं. त्यावर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख, माधव जाधव माध्यमांशी संवाद साधत नेमकं काय घडलं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


नेमकं काय घडलं?


यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्या गुंडांनी मतदान मशीन फोडल्या असल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. त्याचबरोबर 122 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. बिहार पेक्षा जास्त गुंडगिरी इथे चालू आहे. मतदान केंद्रावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन बंद करण्यात आले. त्यानंतर परळीतील बँक कॉलनी परिसरात माधव जाधव आणि देशमुख यांच्या अंगरक्षक मारहाण झाली. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर बुथची तोडफोड धनंजय मुंडे यांच्या लोकांनी केली आणि माझ्या मुलावर पुतण्यावर गुन्हे दाखल केले. लोकशाही मार्गाने मतदान झाले नाही 122 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात यावे, परळी तालुका आणि शहरामध्ये फेर मतदान घ्यावे, अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. 


चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सर्व साम्राज्य त्यांचे आहे. पोलीस महसूल प्रशासन त्यांच्या सोबत आहे. एवढी अराजकता कधीच झाली नाही. लोक भयभीत झाले आहे. आमचे नातेवाईक जर मतदान केंद्रावर गेले असतील तर आम्ही मान्य करू मात्र तो तिकडे गेला नाही. सत्तेचा वापर करून सर्व सामान्य लोकांना उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. आमच्या सोबत माणूस आला नाही पाहिजे याची सर्व खबरदारी घेतली. बिहारला देखील लाजवेल अशी गुंडगिरी आहे, असं म्हणत शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. 


मारहाण झालेले माधव जाधव यांनी सांगितलं बूथवर काय घडलं?


राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे परळी मतदारसंघातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते माधव जाधव यांना काल परळीत मारहाण झाली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं, परळी मतदार संघात प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देशमुख आणि मी मतदार संघात फिरत होतो.त्यावेळी जलालपुर हे बूथ कॅपचर करण्यात आले होते. त्यानंतर बँक कॉलनी परिसरात बूथ कॅपचर झाले होते. हा सर्व घटनाक्रम पोलीस पाहत होते. आमच्या सहकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर मला टार्गेट केलं. मी संवेशनशील मतदान केंद्राबाबत न्यायालयात का गेलो म्हणून मला मारहाण झाली. पोलिसांनी बघ्याची भुमिका घ्यायची नाही, हे कोर्टाचे आदेश असताना देखील पोलीस पाहता होते. मी स्पीड पोस्टाने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधीक्षकांना देखील तक्रार दिली आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.