कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा टप्पा पार पडला आहे. पुन्हा एकदा राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने मतदानामध्ये मोठी बाजी मारली आहे. राज्यातील सर्वोच्च मतदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले असून राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात झालं आहे. करवीर कागल आणि शाहूवाडी आणि शिरोळ या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या उच्चांकी मतदानाने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. 


मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला


आजवरचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा ट्रेंड पाहता वाढलेला टक्का नेहमी सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक ठरला आहे. त्यामुळे हा ट्रेन कायम राहणार की सत्ताधारीच बाजी मारणार याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी बारा वाजेपर्यंत मिळणार आहे. मात्र आतापासून आकडेमोड सुरू झाली आहे. दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांसमोर कॉलर उडवत, शड्डू ठोकत एक प्रकारे विजयाचा दावा केला आहे. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गैबी चौकात जल्लोष करण्यात आला. कागलमध्ये 81.72 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  


6 वाजेनंतरही दोनशेहून अधिक मतदान केंद्रात रांगा


दरम्यान, मतदानादिवशी काही ठिकाणी मतदान यंत्रात बटण प्रेस न होणे, क्लॉक एरर अशा कारणांनी 19 बॅलेट युनिट, 23 कंट्रोल युनिट व 29 व्हीव्हीपॅट वेगवेगळ्या ठिकाणी बदलण्यात आले. मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात सायंकाळी उशिरापर्यंत पाहायला मिळाली. मतदान संपण्याच्या कालावधीवेळी 6 वाजेनंतरही दोनशेहून अधिक मतदान केंद्रात रांगा पाहायला मिळाल्या. सर्व उपस्थित मतदारांना टोकन देवून त्यांचेही मतदान उशिरापर्यंत थांबून घेण्यात आले.  


मतदानासाठी जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी वाडी, वस्ती, गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून प्रशासनाला नागरिकांमधून सर्व स्तरातून साथ मिळाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रांवर आल्याचे दिसले.


कुठेही दखलपात्र गुन्ह्यांची नोंद नाही


जिल्ह्यात झालेल्या मतदानावेळी कुठेही दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली नाही. सर्व प्रक्रिया किरकोळ वादविवाद वगळता अतिशय शांततेत पार पडल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. मतदान केंद्रावरील तीन जाणांनी सोशल मीडियावर मतदान केल्याचे व्हिडिओ पोस्ट करीत मतदान गोपनीयतेचा भंग केला. याबाबत एक जणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून इतर दोघांचा तपास सुरू आहे. उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असलेल्या मतदान केंद्रावरील सुरक्षिततेची काळजी घेत सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये आणण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यानंतर सर्व 10 स्ट्राँग रूममध्ये तिहेरी सुरक्षेत सर्व मतदान यंत्र बंद करण्यत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे



  • चंदगड  – 74.61 टक्के 

  • राधानगरी – 78.26 टक्के

  • कागल  –81.72 टक्के

  • कोल्हापूर दक्षिण –74.95 टक्के

  • करवीर – 84.79 टक्के

  • कोल्हापूर उत्तर – 65.51 टक्के

  • शाहूवाडी – 79.04 टक्के

  • हातकणगंले – 75.50 टक्के

  • इचलकरंजी – 68.95 टक्के

  • शिरोळ – 78.06 टक्के