Daund Assembly Election: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मतदारसंघाच्या शेजारील मतदार म्हणजे दौंड मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल कुल यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात देखील विधानसभेत आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांचा विजय हा काठावर झाला होता. रमेश थोरात यांचा अवघ्या 746 मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी देखील रमेश थोरात (Ramesh Thorat) पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. (Daund Assembly Election)


विधानसभेच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश थोरात अपक्ष निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशातच रमेश थोरात यांचा कल पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याकडे असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षांकडून दौंड विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून वीरधवल जगदाळे अशी त्यांची ओळख आहे. वीरधवल जगदाळे हे दौंड साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यांनी दौंड विधानसभा मतदार संघावर दावा केला. भाजपचे नेते राहुल कुल यांचा हा मतदारसंघ असल्याने जगदाळे यांनी केलेल्या मागणीमुळे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, किंवा या मतदारसंघात बंडखोरीच्या देखील चर्चा आहेत.


दौंड मतदारसंघात कशी आहे परिस्थिती


भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवार यादीत आमदार राहुल कुल यांची उमेवारी निश्चित झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे देखील इच्छुक होते. मात्र, कुल यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागावाटपात मतदारसंघाची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून वीरधवल जगदाळे व वैशाली नागवडे इच्छुक होते.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जागा लढविणार आहे. नामदेव ताकवणे व अप्पासाहेब पवार या मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत. महिला किंवा नव्या चेहऱ्यास उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रमेश थोरात अपक्ष वा पुरस्कृत उमेदवार राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओबीसी व तिसऱ्या आघाडीची भूमिका देखील या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.


2019 ला मिळालेले मताधिक्य


राहुल कुल  - 103664
 रमेश थोरात - 102918