Priyanka Gandhi Nagpur Road Show नागपूर : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. प्रियांका गांधी यांनी गडचिरोतील सभेला संबोधित केल्यानंतर नागपूरमध्ये रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर मध्य या विधानसभा मतदारसंघात प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. या रोड शो दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने आल्याचं पाहायला मिळाले.
बडकस चौकात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. प्रियांका गांधी यांचा रोड शो बडकस चौकात संपला. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्यानं घोषणाबाजी झाली. गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रियांका गांधी यांचा रोड शो संघाच्या मुख्यालयाजवळ येणार हे समजताच भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते देखील तयारीत होते. रोड शो संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील बडकस चौकात आहेत. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केल्याची माहिती आहे.
रोड शो संपल्यानंतर काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी चौकाच्या मधोमध एका ट्रक वर उभे राहून भाषण देण्यास सुरुवात केली. बंटी शेळके यांनी त्यांच्या हातात तिरंगा घेत कार्यकर्त्यांना तुम्हाला तीन रंगाचा झेंडा पाहिजे की दोन रंगांचा झेंडा पाहिजे असा सवाल केला. काँग्रेस कार्यकर्ते आणि बंटी शेळकेंना इमारतीवरुन आणि रस्त्यावर जमलेल्या भाजप समर्थकांकडून भाजपचे झेंडे दाखवण्यात आले.
पोलिसांनी वेळीच वाद रोखला
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हे प्रकरण वाढलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांकडून रोड शो वेगानं पुढं नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पोलिसांची अपेक्षा अशी होती की संध्याकाळ होण्यापूर्वी रोड शो गतीनं निघून जावा. पोलिसांनी धिम्या गतीनं चालणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना वेगानं पुढं जाण्यास सांगितलं असता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. एसीपी अनिता मोरे यांच्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घालत वाद घातला. रोडशो अपेक्षित गतीने पुढे जात नाही म्हणून अनिता मोरे आणि इतर पोलीस अधिकारी रस्त्यात थांबून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत होते. तेव्हा काँग्रेसचे अनेक पुरुष कार्यकर्ते चिडले आणि अनिता मोरे इतर पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारु लागले. यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
इतर बातम्या :