Nevasa Assembly Constituency 2024 : सहकारातून ग्रामोन्नती आणि संतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. सहकारासोबतच राज्याच्या राजकारणातही अहमदनगर जिल्ह्याचा प्रभाव आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील आणखी एक महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणजे नेवासा. नेवासा तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेले शंकरराव गडाख यांची सत्ता आहे. ते सध्या शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत. दुसरीकडे महायुतीकडे मात्र याठिकाणी तगडा उमेदवार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेला गडाख यांना रोखण्यासाठी महायुती कोणता डाव टाकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


२०२४च्या  विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होणार हे नक्की आहे. सध्या नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे महायुती मात्र याठिकाणी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत. याठिकाणी भाजप तसेच अजित पवार गटही दावा करण्याची शक्यता आहे. 


याआधी २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने गडाख यांचा पराभव केला होता. मात्र पुढच्याच पंचवार्षिकला गडाख यांनी या पराभवाचा वचपा काढला. सध्या भाजपकडून उमेदवारीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाअध्यक्ष विठ्ठलराव लंघे उत्सुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते अब्दुल शेख यांनी देखील नेवासा विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. त्यामुळे भाजप नेमकं कुणाला रिंगणात उतरवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.


२०१९ मध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप अशी चुरशीची लढत झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरराव यशवंतराव गडाख १,१६,९४३ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे बाळासाहेब उर्फ ​​दादासाहेब दामोधर मुरकुटे हे ३०.६६३ मतांनी पराभूत झाले होते  .नेवासा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाचा झंडा फडकवला होता. २०१४ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. यावेळी मात्र भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता.