परभणी : जिल्ह्यात यावेळची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशिची ठरणार आहे. या जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या चार मतदारसंघांपैकी जिंतूर या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे तसेच समस्त राज्याचे लक्ष असणार आहे. कारण या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. तिकीट मिळावे म्हणून नेते मंडळी वरिष्ठांना भेटत आहेत. असे असले तरी जिंतूर विधानसभेत भांबळे विरुद्ध बोर्डकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.  


2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं?


परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. कारण येथे भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यातून विस्तवही जात नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या मेघना साकोरे बोर्डीकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. 2019 सालच्या निवडणुकीत मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत विजय भांबळे यांचा मेघना बोर्डीकर यांनी अवघ्या 3717 मतांनी पराभव करत पहिल्यांदाच विजय मिळवला होता. मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 16 हजार 913 मते तर विजय भांबळे यांना 1 लाख 13 हजार 196  मते पडली होती. या निवडणुकीत वंचितचे मनोहर वाकळे यांना 13 हजार 172 मते मिळाली होती. 


यावेळी नेमकं काय गणित असणार? 


यावेळच्या निवडणुकीतही मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यातच लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश नागरे यांनीही कंबर कसली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या जागेवर दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी जोरदार प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा नेमकी कोणाला सुटणार यावर येथील गणित अवलंबून असणार आहे. 


2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? 


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील जनता शिवसेनेचे (संयुक्त) उमेदवार संजय जाधव यांच्या मागे उभी राहिली होती. या निवडणुकीत संजय जाधव यांना 103247 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे (संयुक्त) उमेदवार राजेश विटेकर यांना तेव्हा 79290 मते मिळाली होती. मतांचे हे प्रमाण अनुक्रमे 47 टक्के आणि 36.1 होते. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवर आलमगीर खान हे होते. त्यांना 26079 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या या मतांचे प्रमाण 11.9 टक्के होते. 


हेही वाचा :


Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?