मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी हजर राहावं, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चांवर अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची यादी कधी येणार याबाबत प्रश्न विचारले जात होते. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. 


वर्षावर हजर राहा, आमदारांना आदेश  


शिवसेनेच्या सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर उद्या संध्याकाळी 6 वाजता हजर राहण्याचे आदेश दिले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  सेनेच्या पक्ष कार्यालयातून सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  उद्या उमेदवारांची नावं जाहीर करून एबी फाॅर्म दिले जाण्याची शक्यता आहे. 


भाजपची यादी आली, सेना आणि राष्ट्रवादीचं काय? 


महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा देखील महाविकास आघाडीप्रमाणं सुटलेला नाही. महायुतीमधील भाजपनं पहिली यादी जाहीर करताना 99 जागांवर उमेदवारांची घोषणा  केली. यामध्ये 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेनं लढवलेल्या 5 जागांवर देखील भाजपनं उमेदवार दिला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार किंवा एबी फॉर्मचं वाटप कधी केलं जाणार यासंदर्भातील चर्चा सुरु होत्या. अखेर उद्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे. 


महायुतीत कोण किती जागा लढवणार? 


महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरणार आहे. भाजपनं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवल्या होत्या. यावेळी देखील भाजपकडून अधिक जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून 150ते 160 च्या दरम्यान जागा लढवल्या जाऊ शकतात. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 85 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 50 ते 60 जागा मिळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेत अजून तरी जागा वाटपासंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपनं उमेदवारांच्या नावांची घोषणा केलीय तर अजित पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप सुरु करण्यात आलं आहे. 


इतर बातम्या : 


अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात