मुंबई : माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने मुंबईसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर, पोलिसांनी वेगवान पद्धतीने तपासाची चक्रे फिरुन याप्रकरणातील मुख्य आरोपींना काही तासांतच अटक केली. मात्र, या घटनेच्या खोलात जाऊन पोलिसांचा तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी (Baba siddique) हत्याप्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असून आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, शूटर्सने बाबा सिद्दीकींना निशाणा बनवण्यापूर्वी गोळी मारण्याचा सराव केला होता. त्यासाठी, कर्जत खोपोली रोडवरील एका जंगलात जाऊन गोळी मारण्याचा सराव केल्याचं आरोपींनीच पोलिसांना सांगितलं. पोलीस कोठडीत (Police) अटकेत असलेल्या आरोपी गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप आणि फरार आरोपी शिवकुमार गौतम या तिघांनी येथील जंगलात जाऊन प्रॅक्टीस केली होती. 


पोलिसांमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी झाडावर गोळ्या चालवून गोळीबाराचा सराव केला होता. विशेष म्हणजे कर्जत-खोपोली रोडवरील एका धबधब्याजवळील पलसदरी गावाजवळ असलेल्या जंगलात जाऊन त्यांनी हा सराव केला होता. याच वर्षातील सप्टेंबर महिन्यात म्हणजेच गेल्याच महिन्यात येथील जंगल परिसरात जाऊन गोळी चालवण्याचा सराव आरोपींनी केल्याचे समजते. कुर्ला स्टेशनवरुन लोकल ट्रेन पकडून आरोपी लौजी रेलवे स्टेशनवर उतरले. या स्टेशनवरुन त्यांनी ऑटोरिक्षाने जवळपास 8 किमी दूर असलेल्या पलसदरी गावांत जाऊन जंगलात हा सराव केला होता. येथील ऑटो ड्रायव्हरशी संवाद साधताना आपण येथे फिरायला आलो आहोत, असे त्यांनी म्हटले होते. तसेच, जिथं जंगल, झाडं आणि कोणीही माणसं नसतील अशा ठिकाणी आम्हाला घेऊन चला, असे आरोपींनी रिक्षावाल्याला म्हटले होते. त्यानंतर, रिक्षाचालकाने आरोपींना पलसदरी येथील धबधब्याजवळ जंगलात नेऊन सोडले. आरोपींनी अंदाज लावला होता की, धबधब्याच्या आवाजामुळे गोळीबाराचा काही प्रमाणा कमी येईल. त्यानुसार, येथील गावातील जंगलात असलेल्या एका झाडावर आरोपींनी 5 ते 10 राउंड फायर करत सराव केला होता. 


झिशान सिद्दीकींनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट


दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी तिसऱ्यांदा मुंबई पोलीस आयुक्तालयात भेट दिली. यादरम्यान, दोनवेळा त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे. 


हेही वाचा


मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला