Rohit Pawar on Umesh Patil : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सलग तिसऱ्या दिवशी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेश पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश दिला जात असेल तर आमचा त्याला विरोध असेल अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परीषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
उमेश पाटील यांच्या प्रवेशाला माझा विरोध
शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत प्रवेश नको असे रोहित पवार म्हणाले आहेत. कार्यकर्ता म्हणून उमेश पाटील यांच्या प्रवेशाला माझा विरोध असेल असे रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सलग तिसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला. मात्र, अद्याप उमेश पाटील यांचा राजीनामा स्वीकारला नाही. आज उमेश पाटील आणि शरद पवार यांचा एकत्रित गाडीतून प्रवास केला. त्यामुळं उमेश पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राजीनामा पत्रात नेमकं काय म्हणाले उमेश पाटील?
जवळपास महिनाभरापूर्वी म्हणजे 24 सप्टेंबरला उमेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारला नाही.राजीनामा पत्रात उमेश पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात येत असलेला दुजा भाव यावर बोट ठेवलं आहे. तसेच माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या महिलांवर अतिशय खालच्या पातळीत बोलणाऱ्या व्यक्तीला पक्षात ठेवलं कसं? असा सवाल देखील उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमदार यशवंत माने, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार बबनदादा शिंदे यांनी पक्ष शिस्त मोडली, पण त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? मात्र माझ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचा उल्लेख उमेश पाटील यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून उमेश पाटील हे शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्यामुळं ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
महत्वाच्या बातम्या: