नाशिक : विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर असताना सावतानगर येथील हनुमान मंदिर परिसरात मतदारांना पैसे वाटपाच्या संशयावरून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवसेना उबाठा गट (Shiv Sena UBT) आणि भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमी झाले आहे. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्तांसह संपूर्ण नाशिक शहरातील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) अवतीभवती तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्यासह दोन्ही बाजूच्या 30 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील सावतानगर परिसरातील हनुमान चौक परिसरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ठाकरे गटाचे काही पदाधिकारी मतदारांना स्लिपा वाटत होते. यावेळी महायुतीच्या तसेच भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी स्लिपा वाटपाबरोबर पैसेही वाटप होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी घटनास्थळी गेले.
हाणामारीत दोन जण जखमी
यावेळी जोरदार शिवीगाळ झाल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी दोन्हीही गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा जमाव जमला आणि हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्याभोवती जमाव जमवला कारवाईची मागणी केली. दरम्यान, स्वामी विवेकानंदनगर येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचीही सभा होती. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच त्यांनीही पोलीस ठाणे गाठले व पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
यानंतर आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात राडा केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह दोन्ही बाजूच्या 30 हून अधिक जणांवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल माजवणे, जीवितास धोका पोहचविणे, सार्वजनिक शांतताचा भंग केल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
आणखी वाचा