Digras Assembly Election 2024 यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यवतमाळ, राळेगाव, वणी, अर्णी, दिग्रस,उमरखेड आणि पुसद अशी या जिल्ह्यातील मतदारसंघांची नावं आहेत. काही महिन्यांपूर्वी पाड पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 7 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार आघाडीवर होते. यवतमाळ मधील सात विधानसभा मतदारसंघ, यवतमाळ वाशिम, चंद्रपूर आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघात येतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला 7 पैकी 6 जागांवर विजय मिळाला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला होता. आता दिग्रस मतदारसंघात संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे अशी लढत होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यातील जागा कांग्रेससाठी सोडण्यात आली. कांग्रेस कडून माणिकराव ठाकरे येथून मैदानात उतरले आहेत.
दिग्रस विधानसभा मतदार संघातून संजय राठोड आतापर्यंत चार वेळा विजयी झाले आहेत.राठोड यांनी 2004,2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यातील लढत चुरशीची होणार आहे. माणिकराव ठाकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर असल्यानं संजय राठोड यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मक असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत दिग्रस मतदारसंघात कुणाला आघाडी?
दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघात आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिल्यांदा भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या दबावानंतर भावना गवळी यांची उमेदवारी रद्द करुन राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. दिग्रस विधासनभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख आघाडीवर राहिले. देशमुख यांना 106187 मतं मिळाली. तर, राजश्री पाटील यांना 97520 मतं मिळाली.
दिग्रस विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पहिल्यांदा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आला होता. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेला दर्यापूरची जागा दिल्यानंतर त्या बदल्यात दिग्रसची जागा सोडण्यात आली. दिग्रसमधून माणिकराव ठाकरे लढणार आहेत. माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून चार टर्म प्रतिनिधीत्व केलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दिग्रसमधून महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिला होता. विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडणार हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :