नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणिव आहे.


नाशिकच्या प्रकाश पवार यांनी सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत पवार यांनी मतदान केलं. प्रकाश पवार हे डायलिसिसचे रुग्ण असून गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर अशोक स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना बाहेर पडू नका, असा सल्ला दिला होता. मात्र पवार यांनी डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्ष करत मतदान केलं आहे. तरुणांपासून सगळ्यांसाठीच हे एक आदर्श आहेत.


याच ठिकाणी नीलिमा लोया या 81 वर्षीय आजींनी बायपासची शस्त्रक्रिया झालेली असताना आपल्या पतीसोबत मतदानाचा हक्क बजावला. या आजींना गुडघे दुखीचाही त्रास आहे. मात्र कसलीही पर्वा न करता त्यांनी आपलं मतदान केलं. याशिवाय त्यांनी तरुणांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे.


शिर्डीतही 106 वर्षीय आजीबाईंनी आपला मतदानाचा हक्क बजावला. छबूबाई भगिरथ कुऱ्हे असं या आजींचं नाव आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील बेलापूर गावात त्यांनी मतदान केलं.


वयाचा, आजाराचा कोणताही विचार न करता आपला हक्क, कर्तव्य या मंडळींनी बजावलं आहे. तरुणांनी तर या सर्वांचा आदर्श घेत आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडा आणि जास्तीत जास्त मतदान करा आणि आपलं सरकार निवडून लोकशाही बळकट करा.