शहापूर : सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या, आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग क्र तीन शहापूर तालुक्यातून जातो. मुंबईसह - ठाणे जिल्ह्याचा तहान भागवणारा धरणांचा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे

शहापूर विधानसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाबरोबर प्रामुख्याने आदिवासी,कातकरी महादेव कोळी ,वारली म ठाकूर, क ठाकूर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे या मतदारसंघात आदिवासी समाजाची मतं निर्णायक ठरतात. शहापूर विधानसभा मतदारसंघात पांडूरंग बरोरा यांचे वडील दिवंगत महादू बरोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले जाते. त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले, पुढे त्यांच्या निधनाने त्यांचे पुत्र पांडूरंग बरोरा हे या मतदारसंघात आमदार झाले. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार दौलत दरोडा यांच्यात लढत झाली. बिगर आदिवासी संघर्ष समितीचा पेसा कायदा आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण या निर्णयात माजी आमदार दौलत दरोडा यांनी सहभाग घेतला, या ठपक्याने त्यांच्या विरोधात मतदान झाल्याने ते पराभूत झाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदार पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. परंतु पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेल्यामुळे आता त्यांच्याविरोधात त्यांचे सख्खे चुलत बंधू भास्कर बरोरा यांनी दंड थोपटले आहेत. जर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली, ते  त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी अर्ज दाखल करेन असे भास्कर बरोरा यांनी दावा केला आहे.” यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूरमध्ये भावा विरुद्ध भाऊ अशी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे . तर शिवसेनेत नव्याने प्रवेश घेतलेल्या आमदार पांडुरंग बरोरा आणि माजी आमदार दौलत दरोडा यांच्यात विधानसभा तिकिटावरून अंतर्गत संघर्ष सुरु झाला आहे. त्यातच सेनेत बरोरांना उमेदवारी देऊ नये असा वाद तयार करुन ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी बरोरांच्या उमेदवरीला कडाडून विरोध केला आहे. बरोरांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे माजी आमदार दौलत दरोडा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरोडांनाच विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी एका गटाची आहे.

एकीकडे दरोडांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न होत असतानाच शिवसेनेतून दौलत दरोडा ,पांडुरंग बरोरा ,अविनाश शिंदे ,गजानन गोरे , ज्ञानेश्वर तळपाडे ,चंद्रकांत जाधव ,राजेंद्र म्हसकर, मंजूषा जाधव ,अश्विनी वारगडे  तर भाजपमधून अशोक इरनक ,रंजना उघडा ,नरसू गावडा इच्छुक आहेत तसेच राष्ट्रवादीतून पांडुरंग बरोरा यांचे भाऊ भास्कर बरोरा आणि दीक्षा पडवळ तर काँग्रेस पक्षातून  पद्माकर केवारी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातून महादू शेवाळे आणि दीक्षा पडवळ आणि  भारतीय कम्युनिस्ट पक्षातून नितीन काकरा हे सर्व विधानसभेसाठी इच्छुक  उमेदवारांची नावे आहेत. एकंदरीत शहापुरात उमेवारीचा पेच अधिकच वाढला आहे. पुढील काळात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे शहापूर शिवसेनेचे लक्ष लागले आहे. परंतु जर उमेदवारी मिळाली नाही तर सेनेत अंतर्गत बंडखोर उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शहापूर विधानसभा निवडणुकीत दरोडा विरुद्ध बरोरा अशी सेना आणि राष्ट्रवादीमध्ये दुरंगी लढत होत होती परंतू विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा सेनेत गेल्याने  राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे .

2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी मध्ये दुरंगी लढत झाली असून या निवडणुकीत 64.98 % मतदान झाले असून 135538 मतदार राजांनी  मतदान केला होता.  या लढतीत शिवसेना पक्षाचे दौलत दरोडा यांना 58334 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षाचे पांडुरंग बरोरा  यांना 46065 मतं मिळाली असून  12269 मतांनी शिवसेना पक्षाचे दौलत दरोडा यांनी  राष्ट्रवादी पक्षाचे पांडुरंग बरोरा याना पराभूत केला .तसेच  17438 मतं मिळवून मनसेचे ज्ञानेश्वर तळपाडे तिसऱ्या आणि 4263 मतं मिळवून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम रोज यांनी चौथा क्रमांक पटकावला . तर 2014 च्या शहापूर  विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी मध्ये पुन्हा दुरंगी लढत पाहायला मिळाली या निवडणुकीत 65.76% मतदान झाले असून 154738 मतदार राजांनी  मतदानाचा हक्क बजावला तर  2009 च्या निवडणुकीत दौलत दरोडा यांच्याकडून पराभूत झालेले पांडुरंग बरोरा यांनी आपल्या पराभवाचा बदला घेत शिवसेना पक्षाचे दौलत दरोडा यांना 5544 पराभूत करून दणदणीत विजय मिळवला असून राष्ट्रवादी पक्षाचे पांडुरंग बरोरा यांना 56813 मत मिळाली तर सेनेचे दौलत दरोडा याना 51269 मत मिळाली तर भाजपचे  अशोक इरनक यांनी  18246 मत मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते.

2009 शहापूर विधानसभा    

१)   दौलत दरोडा                  - शिवसेना       - 58,334

२)  पांडुरंग बरोरा                 - राष्ट्रवादी       -  46,065

३)  ज्ञानेश्वर तळपाडे              -  मनसे         - 17,438

एकूण मतदान   -  1,35,538       टक्के  -64.98

दौलत दरोडा  12,269   मतांनी विजयी

2014 शहापूर विधानसभा 

१)    पांडुरंग बरोरा             -  राष्ट्रवादी         -   56,813

४)    दौलत दरोडा             -   शिवसेना       -   51,269

३)   अशोक इरनक            -  भाजप           -   18,246

एकूण मतदान   -  1,54,738      टक्के  -65.76

पांडुरंग बरोरा     5,544    मतांनी विजयी