नाशिक : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेप्रकरणी अजित पवारांनी थेट छगन भुजबळांचं नाव घ्यावं, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. बाळासाहेबांच्या अटकेबाबत अजित पवारांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.


बाळासाहेबांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक होती, हे मी बोलल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळालं. त्यावेळी न्यायालयाने बाळासाहेबांची सुटका केली म्हणून ठीक आहे. मात्र एवढं सगळं होत असताना शरद पवार गप्प का होते, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.


वर्ष निघून जातात, कालांतराने ती परिस्थिती आपल्यावरच उलटते. एका पवारांनी शिवसैनिक शिवसेनेच्या विरोधात उभा केला आणि आता आपले संभाजी पवार उमेदवार त्या (छगन भुजबळ) गद्दारला गाडायला उभे राहिले आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.



काय म्हणाले होते अजित पवार?


बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती. आमच्या मंत्रीमंडळातील काही वरीष्ठांच्या हट्टापायी ही अटक झाली होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, असं आम्ही सांगितलं होतं. परंतु त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. त्यामुळे आम्ही तो निर्णय मागे घ्यायला लावू शकलो नाही.


अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांसोबत जे केलं, तसं कोणाच्याच बाबतीत करू नये. असं का करताय? असा सवाल आम्ही त्यावेळी संबंधित वरिष्ठांना विचारला होता. परंतु ते म्हणाले, आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतंय तो निर्णय घेणार आहोत. तुम्ही यात लक्ष घालू नका.






संबंधित बातम्या