जायन्ट किलर अशी ओळख असलेल्या आणि सलग दोनवेळा आमदारकी मिळवणाऱ्या भारत भालके यांच्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय अवघड बनत चालली आहे. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेशासाठी धडपड सुरु ठेवली आहे. गेल्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत अतिशय निसटत्या मताने विजय मिळविलेल्या भारत भालके यांच्याकडून आश्वासनांची पूर्ती न झाल्याने कार्यकर्ते आणि मतदारांत मोठी नाराजी आहे. आमदार भालके हे थेट कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पहिल्या निवडणुकीत थेट विजयसिंह मोहिते पाटील यांचा दणदणीत पराभव करुन भालके पहिल्यांदा आमदार झाले आणि जायन्ट किलर अशी त्यांनी आपली ओळख तयार केली.
ग्रामीण बाजातील ठसकेबाज वक्तृत्व असल्याने सर्वसामान्यतः अतिशय लोकप्रिय असलेले भालके निवडणुकीची गोळाबेरीज करण्यात तरबेज मानले जातात. त्यामुळेच तुलनात्मकदृष्ट्या अतिशय मजबूत असणाऱ्या प्रशांत परिचारक यांचा त्यांनी तिरंगी लढतीत पराभव करुन दुसऱ्यांदा आमदारकी मिळविली. गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना वेगळी लढल्याचा फायदा भालके यांना मिळाला आणि दुसरा विजय त्यांनी संपादन केला होता. यंदा मात्र भालके यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा असून यातूनही लढण्याची त्यांची जिद्द हेच त्यांच्या यशाचे गमक ठरत आले आहे. भालके यांच्या ताब्यात असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची अवस्था खराब बनल्याने कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत. यातच मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांच्या नावावर काढलेली कर्ज प्रकरण ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघड झाल्याने भालके यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. अशात गेल्या दोन निवडणूक त्यांना खंबीरपणे साथ देणारे मंगळवेढा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, नगरसेवक अजित जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटात प्रवेश केल्याने मंगळवेढ्यात भालके यांची स्थिती खूपच अडचणीची बनली आहे.
सैनिकांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांचे फटकळ तोंड हेच त्यांची सर्वात मोठी कमजोरी असून यामुळेच त्यांना यश नेहमीच अवघड ठरत आले आहे. पंढरपूर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा दूध संघ यासह पांडुरंग व इटोपियन साखर कारखाना व बलाढ्य अर्बन बँक अशी सत्तास्थानांची मोठी यादी पाठीशी असणारे प्रशांत परिचारक हे संघटन कौशल्यात हुशार असून आज त्यांचेकडे सर्वात मोठी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी आहे. काका सुधाकर परिचारक यांची दीर्घकाळ आमदारकीची पुण्याई आणि सत्ताबळांच्या जीवावर परिचारक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात.
गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीकडून लढलेल्या परिचारकांचा तिरंगी लढतीत 8 हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी शिवसेनेचे उमेदवार समाधान आवताडे यांनी तब्बल 40 हजार मते मिळविली होती. मतांच्या फाटाफुटीत भालके यांची दुसऱ्यांदा लॉटरी लागली होती. यंदा मात्र आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढ्यात भालके यांचे अनेक बिन्नीचे शिलेदार आपल्याकडे वळवून घेतले असून मंगळवेढ्यात प्रचंड शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना धडकी भरवली होती. परिचारक यांची पंढरपूरमध्ये मोठी ताकद असून भालके यांची मंगळवेढ्यात मोठी ताकद आहे. यामुळेच मंगळवेढ्यात आता प्रशांत परिचारक यांनी शिरकाव करत आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे समाधान आवताडे यंदा कोणत्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरतात यावर लढतीचे चित्र समोर येणार आहे. मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखाना, एक खाजगी साखर कारखाना, सूत गिरणी यासह मंगळवेढा बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यावर समाधान आवताडे यांची सत्ता आहे. मंगळवेढा नगरपालिकेतही आवताडे गटाच्या नगरसेवकांची ताकद निर्णायक असल्याने मंगळवेढ्यात आवताडे भारत भालके आणि प्रशांत परिचारक दोघांपेक्षाही मोठी ताकद आहे. एका बाजूला मंगळवेढ्याच्या कार्यक्षेत्र केलेल्या समाधान आवताडे यांचा पंढरपूर तालुक्यात कमी संपर्क असल्याने त्यांची संपूर्ण भिस्त मंगळवेढ्यावरच राहणार आहे. गेल्यावेळी शिवसेनेकडून लढलेले आवताडे यांनी गेली पाच वर्ष भाजप आणि मुख्यमंत्र्यांशी जवळीक ठेवल्याने यंदा शिवसेनेने जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी शैला गोडसे या महिलेला उमेदवार म्हणून पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. तसे पाहता शिवसेना ही प्रत्येक वेळेला आयात उमेदवारावर विसंबून राहिल्याने पक्षाचे येथे फारसे अस्तित्व दिसून येत नाही.
यंदा निवडणुकीत अडचणी वाढल्याने आमदार भारत भालके यांनी भाजपाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याने काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आमदार भालके यांना भाजपने उमेदवारी न दिल्यास त्यांना पुन्हा काँग्रेस आघाडीकडून निवडणूक लढवावी लागणार आहे. अशावेळी शिवाजी काळुंगे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने यंदा या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. यातील ज्याला तिकीट मिळणार नाही तो वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागणार असून युतीमध्ये ही जागा रयत क्रांती पक्षाकडे गेल्यास प्रशांत परिचारक अन्यथा त्यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळणार हे नक्की असून आवताडे आणि परिचारक यांच्यातून एक उमेदवार देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील असतील. प्रशांत परिचारक यांच्या विधानपरिषद आमदारकीचा तीन वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असल्याने त्यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील दुसरा उमेदवार दिला जाऊ शकतो. अशावेळी आमदार परिचारक यांचे बंधू उमेश अथवा चुलते माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे नाव पुढे येऊ शकते.
विधानसभा 2014 निवडणुकीतील मतांची आकडेवारी
- भारत भालके (काँग्रेस ) - 91,863
- प्रशांत परिचारक (स्वाभिमानी शेतकरी संघटना) - 82,950
- समाधान आवताडे (शिवसेना) - 40,910
- चंद्रकांत बागल (राष्ट्रवादी) - 3075